नोटबंदीच्या काळात तुम्ही काय केलं?, हे मला माहिती, गिरीश महाजनांचा खडसेंना इशारा

0

जळगाव : राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यातील शाब्दिक चकमकी सुरु असून गिरीश महाजन यांनी सोमवारी खडसे यांना लक्ष्य केले. नोटाबंदीच्या काळात तुम्ही काय धंदे केले, हे मला बोलण्यास भाग पाडू नका, असा थेट इशारा मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना (Girish Mahajan On Eknath Khadse) दिला आहे. नोटबंदीच्या काळात तुम्ही काय केले, कुठे आणि कोणत्या प्रकारे नोटा बदलल्या, हे सर्व माहित असल्याचा दावा महाजन यांनी केला आहे. गिरीश महाजन यांच्या या दाव्यामुळे आता गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. महाजन यांच्या टीकेवर खडसे यांच्याकडूनही उत्तर येण्याची शक्यता आहे.


खडसे यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या टीकेवर गिरीश महाजन यांनी यापूर्वीही एकनाथ खडसे यांना लक्ष्य केले आहे. खडसे मुलगा निखिल खडसे याची आत्महत्या झाली की खून झाला, याचा तपास करावा लागेल, असे खळबळजनक वक्तव्य यापूर्वी महाजन यांनी केले होते. जिल्हा दूध संघाच्या प्रचारासाठी मेळावा पार पडला. या मेळाव्याला मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती. मेळाव्यातील भाषणात बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार हल्लाबोल केला. गिरीश महाजन यांनी म्हटले की, एकनाथ खडसे माझ्यावर आरोप करतात. मात्र माझ्याकडे बोट दाखवताना चार बोटे त्यांच्याकडेच आहेत. नोट बंदीच्या काळात त्यांनी काय काय केले, कुठे कुठे आणि कशा कशा नोटा बदलल्या, हे सर्व मला माहीत आहे. मात्र ते बोलायला लावू नका ,असा थेट इशारा महाजन यांनी खडसे यांना दिला. शिंद गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा दूध संघाची निवडणूक सर्व पक्षांनी एकत्र येऊन अविरोध करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. एकनाथ खडसे यांनीही त्यासाठी तयारी दर्शवली होती. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांनी त्यास अप्रत्यक्षरीत्या नकार दर्शविला आहे. निवडणूक लढवा आणि ती जिंकून दाखवा असे थेट आव्हान मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिले आहे. दूध संघ ताब्यात घेण्यासाठी खडसे आणि गिरीश महाजन या दोन्ही नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असल्याचे चित्र आहे. जळगाव दूध महासंघाची निवडणूक 10 डिसेंबर रोजी होणार आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा