पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरला करणार समृद्धी महामार्गाचे उद्घाटन

0

नागपूर : गेले अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या नागपूर ते शिर्डी महामार्गाचे येत्या 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यासोबतच नागपूर मेट्रोचा देखील लोकार्पण सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आहे. वर्धा जिल्ह्यातील वायफळ टोल नाका येथे समृद्धी महामार्गाचे उद्घाटनाचा कार्यक्रम होत आहे.अधिकृतपणे कुणीही जाहीर केले नसले तरी यासाठी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला काम देण्यात आले आहे. या ठिकाणी 25 बाय 45 मीटर असा भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. यासोबतच शेजारी दोन डोम उभारले जाणार असून सुमारे पंधरा हजार लोकांची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे. अलिकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन नव्या वर्षांपूर्वी होईल असे संकेत नागपुरात दिले होते. हिवाळी अधिवेशन काळात या मार्गाचे उद्घाटन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सायन्स काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात येणार आहे.