परवाना असेल तरच घ्या दारू; नाही तर विक्रेत्याला 15 हजारांचा दंड

0

परवानाधारकालाच विकता येते दारू : नियमांचे उल्लेघन केल्यास होणार कारवाई
गोंदिया. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) नियमानुसार दुकानातून मद्य खरेदी करताना मद्यसेवन परवाना आवश्यक (Liquor license required when purchasing liquor) आहे. मात्र, शहर व ग्रामीण अशा दोन्ही भागात मद्यविक्रेत्यांकडून नियमावली गुंडाळून दारूची विक्री केली जात आहे. उत्पादन शुल्क विभागाची मद्यविक्री करण्यासाठीची नियमावली कठोर आहे. मात्र, मद्यविक्रेते या नियमावलीचे पालन करत नाहीत, हे वास्तव आहे. कोणीही यावे आणि दारू घेऊन जावे, असा प्रकार सुरू आहे. परवाना असलेल्या व्यक्तीलाच दारू देणे बंधनकारक आहे. अन्यथा अशा विक्रेत्याला किंवा बारचालकाला 15 हजारांपासून 25 ते 30 हजार रुपयांचा दंड (Penalty) होऊ शकतो; परंतु, परवाना नसतानाही दारू पिणाऱ्यांना सर्रास दारूची विक्री केली जाते. यामुळे मद्यपींचेही चांगलेच फावत आहे. पण, त्यामुळे सरकारचा महसूल मात्र बुडत आहे.
दिवसाचा परवाना 5, तर वर्षाचा 100 रुपयांत
दारू पिण्यासाठी व विकत घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याचा परवान्याची गरज असते.
यासाठीची वयोमर्यादा ही 21 वर्षे आहे. हा परवाना एक दिवस, एक वर्ष किंवा आजीवनही मिळू शकतो. दिवसाचा परवाना 5 रुपये तर वर्षभराचा परवाना 100 रुपये आणि एक हजारात आजीवन परवाना मिळतो.
परवाना कोठे मिळतो?
मद्यसेवन करण्याचा परवाना ऑनलाइन देण्याची सुविधा आहे. त्याकरिता आधारकार्ड आवश्यक आहे. एक वर्ष किंवा आजीवन परवाना मिळविण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग कार्यालयात अर्ज करावा लागतो.

कुठे कारवाई तर कुठे दुर्लक्ष
राज्याच्या काही भागांमध्ये परवाना नसलेल्या ग्राहकांना मद्यविक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. संबंधितांकडून मोठा दंडही वसूल केला जात आहे. मात्र पूर्व विदर्भात अशाप्रकारची कारवाई कुठेही होताना ऐकीवात नाही.

मद्यविक्री आणि पिणाऱ्यांच्या परवान्यांचा ताळमेळ जुळेल का?

  • दारू परवान्याचे शुल्कही एक्साइजकडे भरले जाते. दुकानात एक्साइज निरीक्षक तपासणीला आले की, मद्यविक्री आणि सेवन करण्याच्या परवान्यांचा ताळमेळ जुळवला जातो. मद्यविक्री आणि पिणाऱ्यांच्या परवान्यांचा ताळमेळ जुळेल का, असा सवाल केला जात आहे.
    काय आहे कायदा?
    परवाना नसताना मद्य बाळगणे तसेच परवाना नसलेल्यांना मद्यविक्री करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे मद्यविक्रेत्यांनी यासंदर्भात योग्य ती खबरदारी घ्यावी, असे कायदा सांगतो.
    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा