मुंबईः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आपल्या खास शैलीत समाचार घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ साली झाली आणि तेव्हापासूनच राज्यात जातीचे राजकारण सुरु झाल्याच्या पुनरूच्चार राज ठाकरेंनी केला. शरद पवार पूर्वी कधीच शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे नाहीत. ‘फुले-शाहू-आंबेडकर’ हा विचार आहे, असेच पवार सांगायचे. मग ‘शिवाजी महाराज’ हा विचार नव्हता का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला (MNS Chief Raj Thackeray on Sharad Pawar Politics). मूळ विचार हे शिवरायांचेच असून शिवरायांचे नाव घेतले की मुस्लिम मते जातात, त्या भीतीपोटीच त्यांचे नाव घेणे टाळले जाते, असा टोलाही राज ठाकरे यांनी पवारांना लगावला आहे. यापूर्वीही राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या राजकारणावर भाष्य करताना राष्ट्रवादीच्या उगमापासून जातीयवाद कसा वाढला, यावर परखड विचार मांडले आहेत.
राज ठाकरे म्हणाले, इतर समाज आणि मराठा समाजात फूट पाडली की दोन्ही खिशात असे पवारांचे राजकारण आहे. मात्र, महापुरुषांना जातीय चष्म्यातून पाहणे अतिशय चुकीचे आहे.
राज ठाकरे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पवारांच्या राजकारणावर भाष्य केले. ‘वीर दौडले सात’ या चित्रपटाबद्दलही त्यांनी मत व्यक्त केले. सिनेमॅटिक लिबर्टी घ्यावीच लागते, असेही ते म्हणाले. कोकण दौऱ्यानंतर राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत.