पाणी बाॅटल्सचा धंदा आणि पर्यावरणाचे प्रश्न!

0

प्रवीण महाजन, नागपूर

घराबाहेर पडलं की सार्वजनिक व्यवस्थेतल्या नळाचे पाणी पिणे विसरत चाललोय आपण. दहा-वीस रुपये फेकले की पाण्याची बाॅटल कुठेही मिळते. मग नळाचे पाणी कोण, कशाला पिणार? स्वच्छ, पिण्यायोग्य, हायजेनिक, आरोग्यास उपकारक असा दावा करून पाणी विकायला बसलेल्या, ज्ञात-अज्ञात दीडशेहून अधिक व्यावसायिकांचा उदरनिर्वाह कसा चालेल, लोकांनी त्या बाटल्या विकत घेतल्या नाहीत तर? खरंतर सुमारे पंचेवीस वर्षांपूर्वी सर्वप्रथम पार्ले कंपनीच्या माध्यमातून भारतात, बिसलेरी नामक ब्रॅण्ड ने पिण्याच्या पाण्याचा व्यवसाय सुरू झाला. हळूहळू कोकाकोला, नेस्ले, पेप्सी अशा कंपन्या मैदानात उतरल्या. छोट्या मोठ्या शहरातल्या छोट्या मोठ्या कंपन्याही मग मागे राहिल्या नाहीत. कुणी स्वतःचे ब्रॅण्डस बाजारात आणले तर काहींनी बदमाशी करुन प्रस्थापित ब्रॅण्डची नक्कल करून गैरफायदा घेत पाणी विकणे सुरू केले. आजघडीला भारतात पिण्याच्या पाण्याचा उद्योग कमालीच्या वेगाने विस्तारत आहे. २०२१ पर्यंत २९७० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी उलाढाल इथल्या पाण्याच्या व्यापारात झाली. २०२९ पर्यंत ही उलाढाल ८९२३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील पाच वर्षांत हा धंदा तब्बल बेचाळीस टक्क्यांनी वॄद्धिंगत झाल्याची माहिती संबंधित अहवालात मांडण्यात आली आहे.


एकीकडे जगाच्या पाठीवरील, अगदी भारतातील सुद्धा, अर्ध्या अधिक लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. ते मिळवण्यासाठी त्यांना कमालीचे कष्ट उपसावे लागतात, पायपीट करावी लागते. राजस्थान सारख्या भागात चरवीभर पाण्यासाठी काही किलोमीटरचे अंतर पार करावे लागण्याची स्थिती आहे आणि दुसरीकडे शहरी भागातील लोकांना मात्र, रेल्वे स्थानकावर, बस स्थानकावर, विमानतळावर उपलब्ध असलेल्या सार्वजनिक नळाचे पाणी प्यावेसे वाटत नाही, ते पिण्यायोग्य नाही, आरोग्यास हानिकारक आहे, त्यांची भावना झाली आहे, म्हणून लोक पदरचे पैसे पाणी विकत घेण्यासाठी खर्च करतात, ही स्थिती कितपत योग्य आहे, याचा विचार‌ होणे गरजेचे झाले आहे. लोकांची क्रयशक्ती वाढली आहे, ते आरोग्याबाबत जागरूक आहेत वगैरे बाबी आहेतच. शिवाय, पान ठेल्यापासून तर किराणा दुकानापर्यंत या बाटल्या सर्वदूर सहज उपलब्ध असल्याचे कारणही आहेच, पाणी विक्री वाढायला. २०० मिली पासून ५० लिटर पर्यंत विविध आकाराच्या प्लास्टिक पिशव्या आणि बाॅटल्समधून हे पाणी विकणारे बिसलेरी, ॲक्वाफिना, किनले, हिमालयन, किंगफिशर, रेल नीर, पतंजलीचे दिव्य जल, ऑक्सीरीच, टाटा वाॅटर ….असे कितीतरी ब्रॅण्डस आज भारतातील शहरी आणि काही प्रमाणात ग्रामीणही, जीवनाचा भाग झाले आहेत. बहुतेक त्यामुळेच की काय, पण बाटल्यांमधून पाणी विकणे हा बिलियन डॉलर्सचा व्यवसाय होतो आहे, झाला आहे.
एक उद्योग म्हणून या क्षेत्राची भरभराट हा आनंदाचा, कौतुकाचा विषय असला, तरी मुळातच त्याचा संबंध थेट निसर्गाशी आणि जनतेच्या अधिकाऱ्यांशी संबंधित असल्याने अनेकानेक प्रश्न आणि समस्या देखील त्यातून निर्माण झाल्या आहेत. होताहेत. पाणी ही निसर्गानी दिलेली देण आहे. मनुष्य अद्याप तरी पाणी निर्माण करू शकलेला नाही. शिवाय नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या पाण्यावर सर्वांचा अधिकार असताना, मूठभर उद्योजक त्यावर अधिकार सांगून, जे निर्माणच केले नाही ते स्वतःचे उत्पादन म्हणून इतरांना विकू कसे शकतात? त्यातून पैसा कसा कमावू शकतात? त्यांना हा अधिकार कोणी दिला, असे अनेक प्रश्न यासंदर्भात उपस्थित होऊ लागले आहेत.. शिवाय हे पाणी विकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, रिसायकलिंगचा कितीही दावा होत असला, तरी कचराकुंडीत टाकल्या जाणाऱ्या या बाटल्यांचा होणारा कचरा, त्यातून उद्भवणाऱ्या निसर्ग संवर्धनाच्या समस्या….अशा अनेक बाबींवर आता वैश्विक पातळीवर चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

भारत हा पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वापरणाऱ्या देशांत, जगात पहिल्या दहामध्ये गणला जातो. अमेरिकेसाखा मोठ्या किंवा सिंगापूर सारख्या छोट्या देशात सर्व नळांचे पाणी पिण्यासाठी योग्य असेल याची काळजी प्रशासकीय पातळीवर घेतली जाते. तेवढ्या चाचण्या करून जलशुद्धीकरणाची प्रक्रिया पार पाडली जाते. तरीही, त्याही देशात सर्रास पाणी बाॅटल्स विकल्या-खरेदी केल्या जाताहेत. त्यामुळे हा प्रश्न आता लोकांच्या मानसिकतेचाही झाला आहे. भारतात नैसर्गिक जलस्त्रोत बव्हतांशी सर्वदूर उपलब्ध आहेत. पण वाढती लोकसंख्या, वाढते तापमान, सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेत सुयोग्य व्यवस्थापनाचा अभाव, त्यामुळे होणारा पाण्याचा अपव्यय, पाणी वाया जाण्याचे वाढते प्रमाण अशा विविध बाबींमुळे पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. पुरवठा व्यवस्था प्रभावीत होते.


अशात जमिनीखालील पाण्याचा नैसर्गिक, सार्वजनिक जलस्त्रोत वापरून त्यावर खाजगी धंदा करणारे लोक, उपसा करून काढलेले पाणी विकण्याजोगे करण्यासाठी जे तंत्रज्ञान व पद्धत वापरतात, त्या प्रक्रियेत एक लिटरची क्षमता असलेली बाटली भरायला प्रत्यक्षात १.३९ लिटर पाणी वापरले जाते. उर्वरीत पाणी वाया जाते. तर यावर या उद्योगक्षेत्रातील महनीयांचा दावा असा, की ते फार कमी पाणी वाया घालवतात! संबंधित इतर उद्योगांमध्ये हे प्रमाण बरेच अधिक आहे. उदाहरणार्थ, एक लिटर सोडा तयार करायला २.०२ लिटर पाणी वापरले जाते. बिअरच्या संदर्भात हे प्रमाण ४ लिटर एवढे आहे. वाईन तयार करताना लिटरमागे ४.७४ लिटर पाण्याचा वापर होतो, तर, हार्ड अल्कोहोल तयार करताना लिटरमागे तब्बल ३४.५५ लिटर पाणी वापरले जाते. म्हणून, पाणी व्यवसायातील जल अपव्यय अत्यल्प असल्याचा दावा करीत या उद्योजकांनी त्याचे समर्थन चालवले आहे. दुसरीकडे , काही अभ्यासकांनी पाणी उद्योगांचा हा दावा खोटा ठरवला असून, प्रत्यक्षात या प्रक्रियेत सहा ते सात पट पाणी वाया जाते, असे म्हटले आहे.


याशिवाय, या उद्योगात प्लास्टिकचा वापर फार मोठ्या प्रमाणात होतो. जसजसा हा व्यवसाय वाढतोय, तसतसा प्लास्टिकचा वापर अजून अजून वाढत आहे. एकट्या अमेरिकेत वर्षाकाठी १७ दशलक्ष बॅरल्स या तेल प्लास्टिक निर्माण प्रक्रियेत वापरले जाते, ज्याचा उपयोग या बाटल्या तयार करण्यासाठी केला जातो. वापरून झाल्यावर कचऱ्यात फेकल्या जाणाऱ्या बाटल्यांची नवीनच समस्या जगभरात निर्माण झाली आहे. एका अभ्यासानुसार जगभर वर्षाकाठी पन्नास कोटी बाटल्यांचा कचरा तयार होऊ लागला आहे. कारण पाणी पिऊन झाल्यावर ८५% बाटल्या कचऱ्यात जातात. फक्त पंधरा टक्के बाटल्यांचेच रिसायकलिंग होते. त्यामुळे नव्या युगात, माणसाला जडलेल्या नवीन सवयीचा, नवीन संकल्पनेचा हा दुष्परिणाम आहे. टॅपवाॅटर च्या तुलनेत कल्पनेपलीकडे महागडे असतानाही या पाण्याचा वापर वाढतोय. एकतर हा उद्योग प्रदूषणात परिवर्तित होतो, पाणी कोणाच्याच मालकीचे नसल्याने ते विकण्याचा कोणालाही अधिकार‌ नाही, त्याची वाढती किंमत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे पाणी नळाद्वारे येणाऱ्या पाण्याच्या तुलनेत शुद्ध असते हा जाणिवपूर्वक पसरविण्यात आलेला समज….निदान या मुद्यांचा विचार करून तरी, या उद्योगाला प्रोत्साहन देऊ नये अशी भूमिका पर्यावरणवाद्यांनी घेतली आहे

Shankhnaad News | epesoid 44 रवा खवा करंजी आणि भरली वांगी