सुतकाचे दिवस होते आणि एक १२-१४ वर्षांचा मुलगा रवी घरातल्या हॅालच्या कोप-यांत शांत ऊभा राहून बाबा, काका, आत्याचे बोलणं ऐकत होतांबाबा सांगत दादांना गुलाबजाम खूप आवडायचे, तर काका म्हणाला त्यांना समोसा खूप आवडायचा लगेच आत्या म्हणाली त्यांना मिरची चा ठेचा, कांद्याची भजी खूप आवडायची. हे सर्व ऐकून एका क्षणी रवी असे वाटलं जसे हे सर्व आपआपल्या आवडीचे पदार्थ आजोबांच्या नावानी खपवत आहेत. तो लगेच ऊठला आणि आजी ज्या खोलीत होती त्या खोलीच्या दरवाज्यामधुन डोकाऊन आत पाहू लागला, रडून रडून कोरडे पडलेले डोळे शुंन्यात लाऊन बसलेली आजी त्याला दिसली. कवी ने आजीच्या चेह-याकडे पाहिले आणि बालकानीतल्या जोपळ्यावर जाऊन बसलां.
हे सर्व पाहून त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. गेल्या काही दिवसांपूर्वीच्या घटना त्याला स्पष्टपणे आठवल्या हाच घराचा हॅाल आणि हिच सर्व मंडळी यां सर्वांन समोर हताश खाली मान घालून बसलेले आजी आजोबा त्यावेळी रवी देखील हॅाल च्या कोप-यात शांत ऊभा हे पाहत होता पण त्यावेळी चर्चा वेगळी सूरू होती आणि प्रत्येकाचा सूर वेगळा होता “या म्हाता-या म्हातारी ला सांभाळायचे कोणी?”, प्रत्येकाचे एकच मत होते की आपल्याला यांना सांभाळणे होणार नाही, त्यावेळी आजी आजोबांचे मत विचारात न घेतां त्यांना दूस-याच दिवशी वृध्दाश्रमात सोडवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस हॅाल मधे रडणारे तिघेच होते रवी आणि त्याचे आजी आजोबा पण त्यांच्या कडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नव्हतां किंवा तशी गरज कोणालाही वाटली नाही. ठरल्याप्रमाणे दुस-याच दिवशी सकाळी त्यांना वृध्दाश्रमात सोडण्यात आले आणि त्याच दिवशी दूपारी आजोबांचे हृद्यविकाराच्या झटक्यानो निधन झाले आणि आज त्याच्या तेरवी आणि गोड जेवणाच्या तयारीच्या वेळी ही सर्व मंडळी त्याच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडीच्या चर्चा करत होते त्याला हे सर्व समजेनासे झाले आणि त्या माजलेल्या विचारांचे काहूर घेऊन आजी च्या मांडीवर डोकं ठेऊन तिला बोलत करू लागला त्याचवेळी त्याची आजी म्हणाली, “ अरे सोन्या, खूप वर्ष आधी देहू चा एक संत सांगून गेला..
भुके नाही अन्न् । मेल्यावर पिंडदान ॥
हे तो चाळवा चाळवी । केली आपणची जेवी ॥
नैवेद्याचा आळ । वेचे ठाकणी सकळ ॥
तुका म्हणे जड । मज न राखावे दगड ॥
तुकाराम महाराज म्हणतात ती ह्या समाजात अशी ही माणसं असतात जी आई-वडिल जिवंत असतांना त्यांना अन्न विचारत नाही पण मेल्यावर त्यांचे पिंडदान करतात आणि त्या दिवशी केलेले अन्न स्वतःच ग्रहण करतात. ते म्हणतात हे देखील गेलेल्या लोकांच्या भावना चावळल्याचाच प्रकार आहे कारण त्यादिवशी देखील हे लोक गेलेल्या लोकांचे निमित्त करून स्वतःच जेवतात.
तसेच दुस-या बाजूलादेखील देवाला नैवेद्य दाखवतांना देखील ही माणसं अशीच वागतात, देवाला नैवेद्याला हे हे पदार्थ लागतात हे स्वतःच ठरवून नंतर स्वतःच स्वाहा करतात
तुकोबां हे सर्व पाहून देवाला विनंती करतात, की देवां कृपा करून तू मला या लोकांन सारख करू नको, ह्यांच्यासारखा जड देहाचा आणि जड बुध्दीचा दगड करू नकोस, माझ्याकडून घेतली तर तुझ्यासाठी आणि पितरांसाठी खरी सेवा करून घे.”
पुढे आजी रवी ला म्हणते ही अशी माणसं जिवंत पणी आई-बापाला विचारत नाही, त्यांना काही खाण्यापिण्याची ईच्छा झाली असेल तर ती देखील पूर्ण केली नसेल. पण कुठला ना कुठला विषय काढून आई-बापा जवळ किरकीर मात्र केली असेल, कादाचित त्यांच्या अंगावर ओरडूनही गेले असतील सुखा समाधानाचे चार घास त्या आई बापाच्या अंगाला लागूही दिले नसतील पण आता मात्र ते गेल्यावर भाताचे उंडे करून त्यांच्या नावाने कावळ्याला आणि कावळा नसेल शिवला तर गाई ला खाऊ घालतील. हे जे करतात ते आई वडीलांच्या प्रेमापोटी नव्हे तर ते मेल्यावर पितृदोष राहू नये या भितीपोटी सगळा विधी असतो. तसेच लोक काय म्हणतील या सामाजिक भीतीपोटी देखील अशी नाटकं करत असतो.
आई-बापाला जेव्हा माणसं मनातून दूर करतात त्या वेळी देव सुध्दा अशा माणसां पासून दूर निघून जातो, ज्या दिवशी आई बापाला त्याने घरातून हाकलून दिलं त्या दिवशी देवांचें वास्तव्य सुध्दा त्या घरातून नाहीसे होते. जो आई बापा विषयी श्रध्दा ठेवत नाही त्याने कितीही श्राध्द घातले देव देव केले तरी काडीमात्र उपयोग नसतो.
घरात आई बाप असतांना कधी ढुंकून पाहिले नाही त्यांना विचारले देखील नाही परंतु ते मेल्यावर कोणत्या दिवशी वारले दिवस कसा?, तिसरं कधी? दहावं कधी? तेरवी कधी? मासीक किंवा वार्षिक कधी? या सर्व तिथी बरोबर लक्षात ठेवतो. सामाजिक प्रतिष्ठा जपायला आध्यात्मिक कार्यक्रम करून समाजापुढे असे ढोंग रचतो जसे की ते जिवंत असतांना यांनी आई बापाला जीव लाऊन सांभाळले.
आजी रवीला जवळ घेत तुकारामाचे अभंग समजून सांगताना म्हणते जो आपल्या आई बापाची काळजी घेत नाही अश्या माणसाने कितीही देवदेव केलं तरी त्याचा फायदा नसतो योग्य वेळ आली की त्याची काठी आवाज न करता त्या व्यक्तिवर नक्कीच जोरदार बरसते.
अनिरूध्द राम निमखेडकर.