पुन्हा एका हत्याकांडानं दिल्ली हादरली! एकाच घरात आढळले चार मृतदेह

0

दिल्लीत श्रद्धा वालकर हत्याकांडाचा खुलासा झाल्यानंतर पुन्हा एकदा दिल्ली हादरली आहे. घटनेच्या तपासात एकापाठोपाठ उलगडणाऱ्या गोष्टींनी थरकाप उडवून दिला. दिल्लीतील दक्षिण पश्चिम जिल्ह्यातील पालम भागात एकाच घरात पोलिसांना चार जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका मुलाने आपले आई-वडील, बहीण आणि आजीची हत्या केल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी रात्री साधारण साडेदहा वाजताच्या सुमारात पोलिसांना या घटनेसंदर्भात माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार चौघांचीही चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे.

आरोपी मुलगा हा व्यसनाधीन असून तो सतत अमंली पदार्थांचे व्यसन करत असे तसेच, नुकताच तो व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडला असल्याचीही माहिती मिळत आहे. पोलिसांनी (Police) आरोपी मुलाची ओळख पटवली आहे. केशव असं आरोपीचं नाव असून त्याचं वय 25 वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अद्याप कोणतीची माहिती दिलेली नाही. 

मृत व्यक्तींची नावं : 

  • आरोपीचे वडील 42 वर्षीय दिनेश कुमार 
  • आरोपीची आजी दीवानो देवी 
  • आरोपीची आई दर्शन सैनी (40)
  • आरोपीची बहीण उर्वशी (22)

काही दिवसांपूर्वी श्रद्धा वालकर हत्याकाडमूळे संपूर्ण देश हादरले आहे. श्रद्धाची तिचा लिव्ह इन पार्टनर आफताबनं निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले आणि ते दिल्लीतील वेगवेगळ्या भागांत फेकून दिले.

श्रद्धाचा खून करणाऱ्या आफताबनंही आपला गुन्हाही कोर्टासमोर कबूल केला आहे. दिल्ली पोलीस (delhi Police) या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास करत आहेत. पोलीस श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मंगळवारी न्यायालयानं आफताबच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ केली आहे. काल आफताबची पॉलिग्राफ टेस्टही करण्यात आली. दरम्यान, श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर दिल्लीतील अनेक घटना समोर आल्या. त्यामुळे दिल्लीत गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याच्या चर्चाही सुरु आहेत.