उपराजधानीतील अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेत (एम्स) प्रथम वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत वाद घालणाऱ्या द्वितीय वर्षाच्या सात विद्यार्थ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. या घटनाक्रमाला पूर्णविराम लागण्यापूर्वीच आता नागूपर मेडिकलमध्ये इंटर्नशिप करीत असलेल्या सहा जणांनी मिळून एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्याचे रॅगिंग घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. मेडिकलच्या ॲण्टी रॅगिंग कमिटी’ने तातडीने निर्णय घेत सहाही जणांना वसतिगृहातून बाहेर काढत त्यांची इंटर्नशिप रद्द केली. लवकरच त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली जाणार आहे. रॅगिंगच्या विरुद्ध अनेक वेळा सर्वोच्च न्यायालय आणि विद्यापीठाने निर्देश दिले आहेत. आपल्या देशात रॅगिंग हा मोठा गुन्हा मानला गेला आहे. मात्र आजही मेडिकलसारख्या आदर्श संस्थेत रॅगिंगचा प्रकार पुढे आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मेडिकलच्या ॲण्टी रॅगिंग कमिटी’च्या ई-मेलवर मंगळवारी सकाळी रॅगिंग झाल्याचा मेल धडकला. सोबत ‘व्हिडीओ’ही होता.
एका समिती पदाधिकाऱ्याच्या पाहणीत हा मेल येताच त्यांनी अधिष्ठातांकडे याची माहिती दिली. त्यांनी याची गांभीर्याने दखल घेत समितीची बैठक बोलावली. व्हिडीओत इंटर्नशिप करणारे सहा विद्यार्थी एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यानी रॅगिंग घेत त्याला झापड मारल्याचे दिसून आले. समितीने रॅगिंग झालेल्या विद्यार्थ्याला बोलावून त्याला विश्वासात घेतले. विद्यार्थ्याने रॅगिंग झाल्याची कबूल देताच व त्याच्याकडून तक्रार नोंदवून घेतली. पुढील तीन तासात समितीने रॅगिंग घेणाऱ्या सहाही इंटर्नना वसतिगृह सोडण्याचे आदेश दिले. सोबतच मेडिकलमधील त्यांची इंटर्नशिपही रद्द केली. ‘एमबीबीएस’चा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर शासकीय रुग्णालयात एक वर्ष रुग्णसेवा देण्याला ‘इंटर्नशिप’ म्हटले जाते. खरेतर भविष्यात वैद्याकीय क्षेत्रेत सेवेच्या दृष्टीने प्रत्यक्ष रुग्णसेवेचा हा सुवर्णकाळ असतो. डॉक्टर झाल्यानंतर भविष्यातील वाटचाल कोणत्या दिशेने जाणार हे याच कालावधित निश्चित होत असते. म्हणूनच इन्टर्न डॉक्टर मन लावून रुग्णसेवा देतात किंबहुना मेडिकलच्या रुग्णसेवा त्यांच्यासह निवासी डॉक्टरांच्या खांद्यावरच असते. आपला कल कोणत्या बाजुने आहे हे शोधून संपूर्ण जीवनाला आकार देण्याचा हा काळ.
यामुळे डॉक्टर रुग्णसेवेवर एरवीपेक्षा अधिक लक्ष केंद्रीत करातात. याच काळात नियम, कायदे पायदळी तुडवीत बेदरकारपणे वागण्याची हिंमत येतेच कशी हाच खरा प्रश्न आहे. खरेतर वैद्यकीय शिक्षण घेणे काही सोपे नाही. त्यासाठी आई-वडिलांना घाम घाळून पैसा गोळा करावा लागतो. विद्यार्थ्यांनीही वर्षानुवर्षे परिश्रम घेत शिक्षण पूर्ण केले असते. नावासमोर प्रतिष्ठेची डॉक्टर पदवीही जोडली गेली असते. अशावेळी एक वाकडे पाऊल साऱ्यांनीच घेतलेल्या मेहनतीवर पाणी फेरू शकते, याचे भान ठेवणे निश्चितच गरजेचे आहे. खरेतर भविष्याचा वेध घेत विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेतात. त्यात रॅगिंगसारखा प्रकार मनावर दूरगामी परिणाम करणारा असतो. यामुळेच रॅगिंगविरोधी कठोर नियमांची अंमलबजावणी केली जाते. रॅगिंगसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी समितीही असते. वेळोवेळी अढावाही घेतला जातो. यानंतरही रॅगिंगसारखा प्रकार करण्याची हिंमत येते कशी, हे चाललंय तरी काय या प्रश्नांची उत्तरे समाजानेच शोधणे गरजेचे आहे.