पोलिस भरतीचे अर्ज करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ, लाखो उमेदवारांना दिलासा

0

मुंबई:पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना मंगळवारी राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय. (Maharashtra Police Recruitment 2022) सरकारने पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठीची मुदत 15 दिवसांनी वाढविली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली. यासंदर्भात अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीची मागणी केली जात होती. त्या मागणीची दखल घेत राज्य सरकारने मुदत पंधरा दिवसांनी वाढवून दिली आहे. आता पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनाआता 15 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज भरता येणार आहे. पोलीस भरतीसाठी गृहविभागाकडे आतापर्यंत 11 लाख 80 हजार अर्ज आले आहेत. मात्र, पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून तक्रारी समोर आल्या होत्या. अर्ज करण्यासाठीची वेबसाईट वारंवार हँग होत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेक ठिकाणी अर्ज भरण्यासाठी बराच वेळ लागत आहे. त्यामुळे सरकारने मुदत पंधरा दिवसांनी वाढविली आहे.


पोलीस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरताना आलेल्या सर्व अडचणी दूर करण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. जाहीर झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. अनेक विद्यार्थ्यांची अद्याप नोंदणीही झालेली नसून काही विद्यार्थ्यांची पेमेंट प्रक्रिया देखील अडकली असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर निर्णय घेत मुदतवाढ केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्यातील 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.
दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग
दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्यात येणार आहे. हा विभाग 3 डिसेंबरपासून कार्यरत होणार असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) वेतनाची थकबाकी देण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन झाल्याचे त्यांनी सांगितले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा