प्रक्षोभक भाषण संजय राऊतांना भोवणार? बेळगाव न्यायालयाचे समन्स

0

मुंबई: प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयाने समन्स बजावले आहे. ३० मार्च २०१८ मध्ये राऊत यांनी बेळगावात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांना समन्स पाठवण्यात आले (Belgaum Court Summons Sanjay Raut) आहे. संजय राऊत यांना १ डिसेंबरला बेळगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. खासदार संजय राऊत १ डिसेंबरला न्यायालयात हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, ​सीमा भागातील बांधवांवर कर्नाटक सरकारने हल्ले केले किंवा कायद्याचा बडगा दाखवून त्यांना तुरुंगात टाकले, तर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मी तेथे गेल्यावर मला अटक करून बेळगावच्या तुरुंगात टाकण्याचे कारस्थान सुरु असल्याचे दोन दिवसांपासून माझ्या कानावर येत आहे, असेही राऊत म्हणाले.


महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरून सध्या वातावरण तापले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराव बोम्मई यांच्या कथित चिथावणीखोर वक्तव्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने कर्नाटक सरकार तर महाराष्टातील शिंदे सरकारवर टीका केली आहे. संजय राऊत हे देखील सातत्याने आक्रमक भाषेचा वापर करत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. संजय राऊत म्हणाले, माझ्या भाषणात प्रक्षोभक काय आहे? हे मला कळले नाही. 2018 मध्ये केलेल्या भाषणाची दखल घेऊन मला त्यांनी आता न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. याचा अर्थ मी तिथे न्यायालयात जावे आणि न्यायालयात गेल्यावर तेथे माझ्यावर हल्ला होील, अशी माझ्याकडे माहिती असल्याचे राऊत म्हणाले. मी बेळगावला गेल्यावर मला अटक करून, बेळगावच्या तुरुंगात टाकण्याचे कारस्थान सुरु असल्याचे दोन दिवसांपासून माझ्या कानावर येत आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्र संदर्भात केलेले वक्तव्य देखील चार दिवसांपूर्वीच आले आहे. महाराष्ट्र सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे. शिवसेना ही सीमा बांधवांसाठी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.