45 लाख रुपयांचे दररोजचे उत्पन्न : 26.47 लाख रोजचा डिझेलवरील खर्च : 19 लाख रुपयांचा नफा
नागपूर. एसटीच्या संपानंतर डबघाईस आलेल्या एसटीला आता चांगले दिवस आले आहे. दिवाळीच्या दरम्यान सर्वाधिक रेल्वेगाड्या रद्द झाल्यानंतर प्रवाशांचा सर्वाधिक लोंढा एसटीकडे वळला (ST is preferred by passengers) आहे. यामुळे एसटी बसेस हाऊसफुल धावताना दिसून येत आहे. सध्याच्या घडीला सुध्दा काही मार्गावरील रेल्वे रद्द असल्याने एसटीतून प्रवास करण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी कोरोना आणि संपाचा फटका एसटी महामंडळाला बसला होता. एसटीची आर्थिक स्थिती बिघडली होती. मात्र,आता एसटी पूर्वपदावर आली आहे. नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील एसटीच्या 8 आगारांना दररोज 26 लाख 42 हजार 700 रुपयांचे डिझेल लागते. एसटीच्या प्रवासी भाड्यातून जवळपास 45 लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत आहे. यातील डिझेलचा खर्च वगळल्यानंतर 19 लाख रुपयांचा नफा एसटीला मिळत आहे. नागपूर विभागात सर्वाधिक उत्पन्न देणारा डेपो म्हणून गणेशपेठ (Ganeshpeth) डेपोचा उल्लेख होतो तर डिझेलचा खर्च सर्वाधिक घाट रोड डेपोवर होत आहे.
30 हजार लिटर डिझेल
एसटीचे उत्पन्न वाढले असताना चार दिवसांपूर्वी डिझेलचे बिल थकल्याने पेट्रोल देण्यास एसटीला नकार देण्यात आला होता. डिझेलचे लाखोंचे बिल न मिळाल्याने पेट्रोल पंप मालकांनी एसटीला डिझेल देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. त्यामुळे पारडी मार्गावरील पेट्रोलपंपाजवळ अनेक एसटी बस उभ्या होत्या. एसटीच्या अधिकाऱ्यांनी वेळीच समजूत काढल्यानंतर कंपणीच्या संचालकांनी डिझेल देण्यास तयार झाले. नागपूर विभागातील एसटीला दररोज 30 हजार लिटर डिझेल लागत असते. शहरातील डिझेल पंप मालकांना अॅडव्हान्समध्येच पेमेंट केले जात असल्याची माहिती विभागीय नियंत्रक,श्रीकांत गभणे यांनी दिली.