मुंबई : प्रेयसीवर बलात्कार झाल्यावर तिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. यामुळे प्रचंड व्यथित झालेल्या प्रियकराने तिला न्याय मिळत नसल्याने आज टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. प्रियकराने चक्क मंत्रालयात जाऊन पाचव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला (Suicide attempt in Mantralaya). मात्र, तो जाळीवर अडकल्याने बचावला. त्याला वाचविण्यात यश आले आहे. त्यामुळे त्याला फारशी दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे पोलिसांनी या प्रकरणी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.मागील तीन वर्षांपासून तिला न्याय मिळावा यासाठी प्रियकराचे प्रयत्न सुरू होते. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलले, असे त्याने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
या घटनेमुळे दुपारी मंत्रालयात चांगलीच खळबळ उडाली होती. बापू नारायण मोकाशी (वय 43 वर्षे) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पारगाव जोगेश्वरी गावातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. ही घटना घडली त्यावेळी मंत्रालयात राज्य मंत्रीमंडळाची बैठक सुरुच होती. त्यानिमित्ताने मंत्रालयात गर्दीही होती. अचानक या युवकाने पाचव्या माळ्यावरून खाली उडी घेतली मात्र तो सुरक्षा जाळीवर पडल्याने बचावला. हा प्रकार लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी धाव घेतली. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. अखेर समजूत काढण्यात यश आल्यावर त्याला सुरक्षा जाळीवरून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्याची विचारपूस केल्यावर हा प्रकार लक्षात आला. प्रेयसीला न्याय मिळावा, यासाठी आपले मागील तीन वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत, पण प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बापू मोकाशी याने केला आहे.
बलात्कारानंतर आत्महत्या करणाऱ्या प्रेयसीला न्यायासाठी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा