बसस्थानकाच्या जागेवर अतिक्रमण

0

भूमिपूजनाचे फलकही झाले गायब ; देसाईगंज येथील प्रकार


गडचिरोली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत देसाईगंज शहरातील (Desaiganj city ) बहुप्रतीक्षित बसस्थानकाचे (bus station ) १९ सप्टेंबर २०१९ ला महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांनी भूमिपूजन पार पडले. भूमिपूजनाला तीन वर्षांचा कालावधी लोटला तरी प्रत्यक्ष इमारत बांधकामाला सुरुवात झाली नाही. जागेकडे दुर्लक्ष झाले आणि आता याच जागेवर अतिक्रमकाऱ्यांनी (encroachment) ताबा मिळविला आहे. ज्या ठिकाणी भूमिपूजन करून भूमिपूजनाचा फलक लावण्यात आली होता तो फलकच गायब झाला आहे. यानंतरही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून दुर्लक्षच केले जात आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे इथे बसस्थानक तयार होईल या नागरिकांच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले आहे. एसटी महामंडळाच्या दुर्लक्षित कारभारावर नागरिकांकडून संतापही व्यक्त होतो आहे. एसटीने ६ हजार १२० चौरस मीटर जागा शासकीय दराने १ कोटी २४ लाख २३ हजार रुपये एवढी रक्कम शासनाकडे भरून ३ नोव्हेंबर २०१८ ला अधिग्रहित केली. तालुका भूमी अभिलेख कार्यालय देसाईगंज यांच्याकडून मोजणी करून सीमांकन निश्चित करण्यात आले. तहसीलदार देसाईगंज यांनी २९ नोव्हेंबर २०१८ ला ताबादेखील दिलेला आहे.
बसस्थानकाची इमारत बांधकामासाठी ३६ कोटी २३ लाख रुपये एवढ्या किमतीचे अंदाजपत्रक तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रालयात फाइल पाठविली असल्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने भूमिपूजन केलेल्या जागेवरचा भूमिपूजनाचा बोर्ड मोक्का स्थळावरून गायब आहे.
नागपूर विभागीय कार्यालयातून निविदा प्रक्रिया पार पाडून अंतिम मंजुरीसाठी आमच्या कार्यालयाकडे फाइल आली आहे. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडे स्वाक्षरीसाठी ठेवलेली आहे. मात्र, याला आणखी कालावधी लागू शकतो, अश शक्यता एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, अत्याधुनिक बसस्थानकाची आस लावून बसलेल्या नागरिकांच्या जीवाला घोर लागून राहिला आहे. आता बसस्थानक तयार होण्याची आस धुसर झाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी प्रशासनाने सक्तीने अतिक्रमण हटवून तत्काळ बसस्थानकाची कामे सुरू करावी, या मागणानेही आता जोर धरला आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा