बांगलादेशकडून संत्र्याच्या आयात शुल्कात वाढ,
केंद्राने हस्तक्षेप करण्याची आ. देवेंद्र भुयार यांची मागणी

0

मोर्शी: नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार (Nagpur Orange Export) असलेल्या बांगलादेशने आयात शुल्कातवाढीचा (Import Duty) निर्णय घेतला आहे. त्यामुळे विदर्भातील संत्र्याला बांगलादेश सरकारचा जोरदार झटका बसला असून बांग्लादेशने संत्र्याच्या आयातीवरील आयात शुल्क वाढवल्याने विदर्भातील संत्र्यांचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे संत्रा निर्यात प्रभावित होईल, अशी भीती व्यक्त करीत या प्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार (Morshi MLA Devendra Bhuyar) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, केंद्रीय वाणिज्य व रेल्वे मंत्री पियुष गोयल, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
बांगलादेशात निर्यात
विदर्भातील वरुड, मोर्शी, परतवाडा, अचलपूर, चांदूरबाजार, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर या भागात मोठ्या प्रमाणात संत्रा पिकतो. विदर्भातील एकूण संत्रा उत्पादनाच्या सुमारे ३५ टक्के संत्र्याची निर्यात बांगलादेशमध्ये केली आहे. गेल्यावर्षी विदर्भातील दररोज सुमारे २०० ट्रक संत्र्याची बांग्लादेशला निर्यात व्हायची. एका ट्रॅकमध्ये साधारणत: २५ ते २७ टन संत्रा असतो. गेल्यावर्षी दोन महिन्यांत सुमारे चार लाख टन संत्रा बांगलादेशला निर्यात करण्यात आला. मात्र, यावर्षी बांगलादेशकडून संत्र्यावरील आयात शुल्कात पुन्हा वाढ करण्यात आली आहे.
निर्यातीला फटका
गेल्यावर्षी ५१ रुपये प्रती किलो असलेले आयात शुल्क यावर्षी वाढवून ६३ रुपये करण्यात आले. गेल्या तीन वर्षांत आयात शुल्कात तिप्पट वाढ झाली आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडून संत्र्याची उचल कमी झाली असून, दररोज जेमतेम २० ते २५ ट्रकच माल निर्यात केला जात आहे. यामुळे संत्र्यांचे भाव गडगडले आहेत. दोन आठवड्यापूर्वी 25 ते 35 हजार रुपये टन या दराने विकला जाणारी संत्री सध्या 18 ते 23 हजार रुपये टनापर्यंत विकला जात आहे. गेल्या काही वर्षात बांगलादेश नागपूर अमरावती जिल्ह्यातील संत्र्याची सर्वात प्रमुख बाजारपेठ बनली आहे. जर बांग्लादेशमधील संत्र्यावरील आयात शुल्काचा प्रश्न केंद्र सरकारने लवकर सोडवला नाही, तर भविष्यात विदर्भातील संत्र्यावर आणखी विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमरावती जिल्ह्यात सुमारे दीड लाख मेट्रिक टन संत्रा उत्पादन होते. यापैकी सर्वाधिक ७८ हजार मेट्रिक टन संत्रा निर्यात एकट्या बांगलादेशला केली जाते. मात्र बांगलादेशने आयात शुल्कात वाढ केल्यामुळे संत्रा निर्यातदारांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. आयात शुल्क वाढीचा फटका शेतकऱ्यांना देखील बसणार आहे. देशांतर्गतच संत्रा प्रक्रिया विक्री करावी लागेल. त्यामुळे दर पडतील, अशी भीती आहे. परिणामी केंद्र सरकारने या संदर्भाने मध्यस्थी करून बांगलादेशला आयात शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव द्यावा, शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेत मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय वाणिज्य व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवून बांगलादेश सरकारशी या संदर्भात चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या या मागणीचा केंद्र सरकारने सहानुभूतिपूर्वक विचार करून बांगलादेश सरकारशी या संदर्भाने चर्चा करून परस्पर सहकार्यातून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा