बांबूपासून डिझेल निर्मितीचा प्रस्ताव, ऑस्ट्रेलियाच्या कंपनीशी चर्चा सुरु-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

0

नागपूर: बांबूपासून डिझेल तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून यासंदर्भात ऑस्ट्रेलियाच्या एका कंपनीची (Diesel from Bamboo) बोलणी सुरू आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी (Forest Minister Sudhir Mungantiwar) दिली. बांबूवर आधारित अनेक अभ्यासक्रम गोंडवाना विद्यापीठात सुरू करणार असून त्यासाठीची प्रक्रिया सुरु झाली असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. बांबूपासून अनेक वस्तु तयार करता येतात. उत्तम दर्जाचे टॉवेल देखील त्यापासून तयार होतात, असेही त्यांनी सांगितले. अलिकडेच पार पडलेल्या अॅग्रोव्हीजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात ‘बांबू उत्पादनातून उत्पन्नाच्या संधी’ यावरील परिषदेत मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये बांबू लागवडीला मोठा वाव असून त्यामुळे विदर्भातील अर्थचक्र गतीमान होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


मुनगंटीवार यांनी यावेळी बोताना सांगितले की, महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये ही बाब शक्य आहे. बांबू संदर्भातील नवनवीन संशोधन सुरू असून शास्त्रशुद्ध बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष सिद्ध होऊ शकते. जागतिक स्तरावर बांबूची मोठी व्यापार पेठ असून चीन व आशिया खंडातील अन्य देशांमध्ये बांबूवर आधारित अर्थव्यवस्था बळ घेत आहे. बांबू उत्पादन योग्य प्रकारे हाताळल्यास हे पीक कल्पवृक्ष सिद्ध होऊ शकते. हे प्रयोगातून सिद्ध झाले आहे. अन्न-वस्त्र-निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या सर्व क्षेत्राला बळकटी देण्याचे काम बांबूचे उत्पादन करू शकते. बांबूपासून धानापर्यंत पोहोचण्यासाठी लवकरच वनविभाग मनरेगा, जलसंधारण विभागाची बैठक घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले.
पाशा पटेल यांनी यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे, असे आवाहन केले. प्रास्ताविकातून डॉ. सी. डी. मायी यांनी बांबू लागवडीविषयी माहिती दिली.

सावजी चीकन आणि खीमा कलेजी रेसिपी | Saoji Chicken Recipe & Keema Kaleji Recipe|Epi 43|Shankhnaad News