बाह्य रुग्‍ण विभागात रुग्‍णांची गर्दी

0

नागपूर, 11 नोव्‍हेंबर 2022
आयुर्वेद व्‍यासपीठच्‍या रजत जयंती वर्षानिमित्‍त, भारत सरकारच्‍या आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने शुक्रवारी कविवर्य सुरेश भट सभागृहाच्‍या परिसरात रुग्‍ण चिकित्‍सा शिबिर व आरोग्‍य प्रदर्शनीचे उद्घाटन वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांच्‍या हस्‍ते पार पडले. सकाळपासूनच शिबिरातील बाह्य रुग्‍ण विभागात रुग्‍णांची गर्दी बघायला मिळाली.
बाह्य रुग्‍ण विभागात देशभरातून आलेले 34 प्रख्‍यात वैद्य आपली सेवा देत आहेत. मार्गदर्शक वैद्य मीरा औरंगाबादकर यांच्‍या मार्गदर्शनात स्‍त्रीरोग, मधुमेह, संधीविकार, त्‍वचा विकार, नेत्ररोग, अग्निकर्म व वेदनोपचार, मानसरोग, कर्करोग आदीचे तज्ञ वैद्य रुग्‍णांची मोफत तपासणी व औषधोपचार केले जात आहेत. हे शिबिर 13 नोव्‍हेंबर पर्यंत दररोज सकाळी 10 ते 1 व सायंकाळी 4 ते 7 वाजेदरम्‍यान चालणार असून सर्वांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन वैद्य मीरा औरंगाबादकर यांनी केले आहे.
आरोग्‍य प्रदर्शनीने 70 हून अधिक आयुर्वेदिक वनौषधी स्‍टॉल्‍स लावण्‍यात आले असून आयुर्वेद विषयक पुस्‍तके व वैद्यकीय चित्रांची प्रदर्शनीदेखील येथे बघायला मिळेल.
दिवसभरात ‘विविध योजना – राष्‍ट्रीय औषधी पादा बोर्ड’ विषयावर तनुजा नेसरी यांचे व्‍याख्‍यान, ‘परदेशात आयुर्वेदाच्‍या संधी’ विषयावर वैद्य मनोज नेसरी, वैद्य हितेंद्र मैंद, वैद्य सुनील जोशी व वैद्य तन्‍मय गोस्‍वाी यांचे चर्चासत्र पार पडले.
………….
‘क्‍यूआर कोड’करणार प्रकृती चिकित्‍सा
कार्यक्रमात वैद्य जयंत देवपुजारी यांच्‍या हस्‍ते प्रकृती चिकित्‍सा ‘क्यूआर कोड’चे विमोचन करण्‍यात आले. हा कोड आपल्‍या मोबाईलने स्‍कॅन केल्‍यानंतर त्‍यात तुमची माहिती भरावी लागते व त्‍यानंतर हे अॅप तुमची प्रकृती कफ, पित्‍त किंवा वात अशी कोणत्‍या प्रकारची आहे, याची माहिती पीडीएफ फॉरमॅटमध्‍ये उपलब्‍ध करून देते. कार्यक्रमाला मोठ्या संख्‍येने उपस्थित नागरिकांनी आपल्‍या प्रकृतीची या क्‍यूआर कोडद्वारे चिकित्‍सा करून घेतली.
……………
आज डॉ. मोहनजी भागवत यांच्‍या हस्‍ते चर्चासत्राचे उद्घाटन
राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा. डॉ. मोहनजी भागवत यांच्‍या हस्‍ते शनिवार, 12 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री मा.सर्वानंद सोनोवाल, सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा, भारतीय चिकित्‍सा पद्धती राष्ट्रीय आयोगाचे सभापती वैद्य जयंत देवपुजारी व श्री धूतपापेश्‍वरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रणजीत पुराणिक यांची उपस्‍थ‍िती लाभणार आहे.
…………….

  1. पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा भाषण करताना. व्‍यासपीठावर वैद्य मनोज नेसरी, वैद्य जयंत देवपुजारी, वैद्य के राजेश्वर रेड्डी व रणजीत पुराणिक, वैद्य विनय वेलणकर व इतर.
  2. बाह्य रुग्‍ण विभागात रुग्‍णांची गर्दी
  3. आयुर्वेदिक वनौषधी स्‍टॉल
  4. प्रकृती चिकित्‍सा ‘क्‍यूआर कोड’