भंडारा जिल्ह्यात धान धरेदी केंद्रात ८.५६ कोटींचा घोटाळा

0

खोट्या कागदपत्रांच्या आधारे धान खरेदी : संस्थेच्या अध्यक्षांसह दहा जणांवर गुन्हा
भंडारा. तुमसर तालुक्यातील येरली येथील धान खरेदी केंद्रात खोटे दस्तऐवज सादर करून शासनाची दिशाभूल करण्यात आली आहे. या प्रकाराने तब्बल ८ कोटी ५६ लाख ९४ हजारांचा घोटाळा (Scam in paddy buying center at Yerli in Tumsar taluka) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात संस्थेच्या अध्यक्षांसह दहा जणांवर गुरुवारी सायंकाळी तुमसर ठाण्यात गुन्हा दाखल (A case was registered against ten people including the president of the organization) करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तुमसर येथील संत रविदास मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेला तालुक्यातील येरली येथे धान खरेदी केंद्र मिळाले होते. खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये प्रत्यक्ष धान खरेदी न करता खरेदीचे खोटे दस्तऐवज तयार करून शासन, शेतकरी व पणन महासंघाची फसवणूक केल्याची तक्रार जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण पाटील यांनी तुमसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यात संगनमत करून खरीप पणन हंगामात २०१९ पासून ८ कोटी ५६ लाख ९४ हजार २५७ रुपयांचा अपहार झाल्याचे नमूद आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संत रविदास मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष नितीन शालिक भोंडेकर, उपाध्यक्ष संदीप प्रकाश भोंडेकर, संचालक शैलेश राजकुमार तांडेकर, सुनील बसुदास तुरकाने, अजय सदानंद कनोजे, विनोद कुमार प्रेमदास झाडे, अभय प्रकाश रोडगे, अश्विन अजय भोंडेकर, रवी मोतीलाल नरसुरे, ग्रेडर अतुल प्रकाश चौबे (सर्व रा. तुमसर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय नितीन मदनकर तपास करीत आहेत.
तक्रारीत आरोपींनी संगनमत करून खरीप पणन हंगामात १ ऑक्टोबर २०१९ ते ३० जून २०२२ दरम्यान २८ हजार ६१२.४४ क्विंटल धान रक्कम ८ कोटी ३२ लाख ६२ हजार २०० रुपये आणि ७१ हजार ५३२ बारदाना नग – किंमत २४ लाख ३२ हजार ५७ रुपये असा ८ कोटी ५६ लाख ९४ हजार २५७ रुपयांचा अपहार झाल्याचे नमूद आहे.आरोपींवर त्यांच्यावर गुन्हा भादंवि ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा