भाजपा कार्यकर्त्यांनी पक्षासाठी जीवाचे रान केले – चंद्रशेखर बावनकुळे

0

नागपूर : प्रलंबीत कामे मार्गी लागून जिल्ह्याचा विकास साधला जातो. संघटनात्मक दौर्‍याच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या मदतीने नवीन लोक पक्षात प्रवेश घेत असून, जन प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी संघटन महत्वाचे आहे. पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपा एक नंबरचा पक्ष असेल असा आशावाद प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यासह ग्रामीणमध्ये भाजपाची स्थिती बळकट असून, येणार्‍या काळात पक्ष आणखीन बळकट करण्यासाठी ताकदीने निवडणूका लढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मौदा येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधुन महाराष्ट्र राज्यात संघटनात्मक दौरा सुरू केला. याचाच भाग म्हणून मंगळवार, ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मौदा येथील रुक्मिणी सभागृह येथे मौदा शहर भाजपाच्या वतीने सत्कार समारंभ व दिवाळी स्नेहमीलनाचा कार्यक्रम तसेच मौदा शहर भाजपाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कामठी- मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात आला होता, याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपा नेते नरेश मोटघरे, माजी विरोधी पक्ष नेते अनिल निधान, अशोक हटवार, तालुकाध्यक्ष हरीश जैन, खेमराज चाफले, मोरेश्‍वर सोरते, रमेश कुंभलकर, प्रकाश येळणे, शरद भोयर, अशोक वंजारी, देविदास कुंभलकर, तिलक दंडारे, नीलिमा घाटोळे, सुनीता पाराशर, विमल पोटभरे, सुषमा कुंभलकर, वैशाली चव्हाण, कार्यकर्ते व मोठय़ा संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बावनकुळे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्याने शिवसेना- राष्ट्रवादी अन् काँग्रेसचे नेते बावचळले आहे. कुठल्याही विषयाचा बागुलबुवा करून विद्यमान सरकारला बदनाम करण्याचे काम महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे नेते आहेत. येणार्‍या काळात होणार्‍या निवडणुका भाजपा युतीच्या माध्यमातूनच लढविणार असल्याचे स्पष्ट करीत शिवसेना-भाजपा युती अधिक घट्ट होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ४५ प्लसचा नारा भाजपाने दिला असून, त्यात शिंदे गटाच्या उमेदवारांना देखील उमेदवारी मिळणार असून, त्यांना निवडून आणण्यासाठी भाजपा पूर्ण ताकद उभी करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते सक्रिय असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.