‘भारत जोडो’ चे ‘वर्किग एलिमेंट’ आशीष उके
महाराष्‍ट्रातील यात्रेच्या यशात नागपूरचे विशेष योगदान

0

नागपूर, 22 नोव्‍हेंबर
कन्‍याकुमारी ते काश्‍मीर ही ‘भारत जोडो’ यात्रा विदर्भ, मराठवाड्यातील भरघोस प्रतिसादानंतर पुढे निघाली. पण या संपूर्ण महाराष्‍ट्रातील ‘भारत जोडो’ यात्रेच्‍या आयोजनाचे प्लॅनिंग, डॉक्युमेंटेशन, ले-आउटिंग, तांत्रिक बाजू, गर्दीचे व पत्रकार परिषदांचे नियोजन, निवाऱ्याची, जेवणाची सोय अशा सर्व पातळीवर उत्‍तमोत्‍त्‍म सेवा देत कौतूकास पात्र ठरले ते नागपूरचे युवा उद्योजक आशीष उके.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची ही ‘भारत जोडो यात्रा’ दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून सुरू अून ७ नोव्हेंबर तिचा महाराष्‍ट्रात प्रवेश झाला. पुढचे १५ दिवस विदर्भ आणि मराठवाडा ही यात्रा मार्गक्रमण करत होती. दररोज किमान पंचवीस किलोमीटर पायी चालणे, शेकडो लोकांच्या भेटीगाठी घेणे, वेळोवेळी सभा, संमेलने आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणे तर अनेकदा पत्रकार परिषदा घेत लोकांना माहिती देणे असा भारत जोडो यात्रेचा भरगच्च कार्यक्रम निरंतर सुरु होता. सातत्याने चालणाऱ्या या लक्षावधी जनसमुदायाच्या मागे परिपूर्ण नियोजनासाठी एक वर्किंग फोर्स कार्यरत होते ते ‘वी- द वर्किंग एलिमेंटस’ होते.
‘वी- द वर्किंग एलिमेंटस’ ही नागपुरातील इव्हेंट्सचे व्यवस्थापन कंपनी असून आशीष उके त्‍याचे संचालक आहेत. १५ वर्षांचा गाढा अनुभव असलेल्‍या आशीष उके यांनी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’, ए.आर.रेहमान यांचा शो सारखे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांचे यशस्‍वी नियोजन केलेले आहे.
आशीष उके म्‍हणाले, ‘भारत जोडो’ यात्रेच्‍या नियोजनात आम्‍हाला महाराष्ट्र कॉंग्रेसचे महासचिव श्री. अभिजित सपकाळ आणि श्री. सचिन गुंजाळ यांच्यासह प्रदेशाध्यक्ष श्री. नानाभाऊ पाटोले, माजी मुख्यमंत्री श्री. अशोकराव चव्हाण यांचे अमुल्य मार्गदर्शन लाभले. राहुल गांधी यांच्यासोबत फिरत उत्‍साह संचारला होता. भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्र प्रवेशाचा क्षण हा क्रांतीची मशाल हाती घेऊन हजारो कार्यकर्त्यांसह राहुलजींच्या आगमनाने अविस्मरणीय झाला तर यात्रेचा महाराष्ट्रातील शेवटचा दिवस हा संत नगरी शेगाव येथील अतिविराट सभेच्या आयोजनाने डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.
“यात्रेला आजवरचा सर्वाधिक सकारात्मक प्रतिसाद महाराष्ट्रात मिळाला” असे राहूल गांधी यांचे गौरवोद्गार आमच्‍या पाठीवर कौतुकाची थाप देणारे ठरले, असे आशीष उके म्‍हणाले. आशिष उके या सर्व यशाचे श्रेय त्यांचा सुसज्ज अशा टीमला, इतक्या वर्षांच्या अनुभवाअंती विकसित करण्यात आलेल्या एका आदर्श कार्यपद्धतीला आणि प्रदेश काँग्रेसचे महासचिव श्री. अभिजित सपकाळ यांना दिले आहे.