‘भारत जोडो’ यात्रेचा वाशीम जिल्ह्यात धुमधडाक्यात प्रवेश

0

लाल किल्याची प्रतिकृती आणि आदिवासी संस्कृतीने भव्य स्वागत.


अंजनखेड (जिल्हा वाशीम) :मंगळवारी सकाळी भारत जोडो यात्रेने हिंगोली जिल्ह्यातून वाशीम जिल्ह्यात मोठ्या धुमडाक्यात प्रवेश (Bharat Jodo Yatra In Washim District) केला. वाशीमच्या वेशीवर लाल किल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती. ढोल ताशाचा गजर, वाशीम जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे पारंपरिक नृत्य, तसेच हिंगोली, वाशीम, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांसह सांगलीतुन आलेली हजारोंची गर्दी, असे भव्य स्वागत यावेळी करण्यात आले. या यात्रेने संपूर्ण वाशीम जिल्ह्यात चैतन्य पसरले होते. भारत जोडो यात्रेची सुरवात मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास फळेगाव येथून ढोल ताशाच्या गजरात आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरणात झाली. दहा वाजता अंजनखेड येथे विश्रांतीसाठी थांबली. संध्याकाळी अंजनखेड येथून सुरू होऊन यात्रा वाशीम शहरात दाखल होईल. स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी नृत्यकला अनेक ठिकाणी सादर केली होती. त्यामध्ये आदिवासी संस्कृती, दंडार, ढोलताशे, भेमसा नृत्य याचा समावेश होता.


सकाळच्या सत्रात राहुल गांधींसोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, आ. डॉ. प्रज्ञा सातव उपस्थित होते.
रस्त्याच्या बाजूला उभ्या खेड्यातील लहान मुलांमुलींचा एक समूह पाहताच राहुल गांधी यांनी त्यांना जवळ बोलावले. त्यांना चॉकलेट देत त्यांच्याशी संवाद साधला तर रस्त्यावर उभ्या असलेल्या ग्रामीण महिलांचा समूहही त्यांना भेटला. मग त्यांना आपुलकीने मिठी मारली आणि आशीर्वाद देऊन सुरक्षा कड्यातून बाहेर आल्या. एकेठिकाणी तुर पिकाची झाडे हातात घेवून शेतकरी बैलगडीसह राहुल गांधींना भेटायला आले होते. शेतकऱ्यांचे जीवन किती कष्टाने भरलेले आहे, हे सांगण्यासाठी आम्ही बैलगाडीसह आल्याचे त्यांनी सांगितले.


आदिवासी हेच मुळनिवासी, देशाचे खरे मालकः राहुल गांधी


आदिवासी समाजाच्या न्याय, हक्कासाठी भगवान बिरसा मुंडा ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढले व वयाच्या २४ वर्षी शहिद झाले. ब्रिटिशांच्या बलाढ्य सत्तेसमोर ते झुकले नाहीत. हजारो वर्षापूर्वी देशात जंगल मोठ्या प्रमाणात होते आज ते नष्ट होत आहे पण जंगलाचे रक्षण आदिवासी बांधवांनीच केले. आदिवासी बांधवच या देशाचे मुळ निवासी व मालक आहेत, असे खा. राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त वाशिम जिल्ह्यातील आदिवासींच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, देशाच्या जमिनीवर पहिला हक्क आदिवासी बांधवांचा आहे. ही जमीन तुमची आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा तुम्हाला आदिवासी मानत नाही वनवासी म्हणते, भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांवर हे आक्रमण करत आहेत. वनवासी संबोधून तुमचे हक्क हिरावून घेतले जात आहेत पण काँग्रेस पक्ष सदैव आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी कट्टीबद्ध आहे. काँग्रेस सरकारने आदिवासींच्या हक्कासाठी निर्णय घेतले. भाजपा संविधानच मानत नाही त्यामुळे आदिवासी, दलित, वंचित, अल्पसंख्याक समाजाला त्यांचे हक्क मिळू नयेत अशी भाजपाची भूमिका आहे. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा हे जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात लढले आज आपल्याला जुलमी भाजपा सरकारच्या विरोधात लढायचे आहे. वनवासी म्हणून भाजपा आदिवासी बांधवांचा अपमान करत आहे. आदिवासी बांधवांचे हक्क काँग्रेसच देऊ शकते त्यासाठी काँग्रेसचे सरकार आले पाहिजे व राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजेत देशाचे संविधान, तिरंगा सहीसलामत रहावा यासाठीच राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे असेही नाना पटोले म्हणाले. यावेळी व्यासपीठावर प्रभारी एच के पाटील, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय आदिवासी विभाभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, खा. बाळू धानोरकर, AICC चे सचिव सहप्रभारी आशिष दुआ व पदाधिकारी उपस्थित होते.