माफ करा मि. गोखले!

0

मिस्टर विक्रम गोखले, ( Vikram Gokhale ) खरंच माफ करा आम्हाला. तुमच्या लाख मोलाच्या जीवनाची कवडीमोल किंमतीत बातमी विकली आम्ही परवा. खरं तर पत्रकार घाईत असतात. त्यांना बातम्या द्यायच्या असतात. आणि अलीकडे तर सनसनाटी निर्माण करण्याची जबाबदारीही त्यांनाच पार पाडावी लागतेय्. एकाच माणसाने किती जबाबदाऱ्या पार पाडायच्या, तुम्हीच सांगा, मिस्टर गोखले. झालं कसं ना विक्रमराव, तुमची तब्येत नाजूक होती. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, नातेवाईक-मित्रपरिवाराचे निराश चेहरे सारं काही सांगून जात होते. शेवटच्या काही घटकाच आता हाती उरल्या असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. एक पत्रकार, त्याच्या हाती लागलेल्या इतक्या महत्वाच्या माहितीचा उपयोग करणार नाही, ही अशक्य कोटीतील बाब होती. त्याला वाटलं, काहीच वेळ तुम्ही जगू शकाल, हे तर खुद्द डॉक्टर म्हणताहेत. आणि बातमी रात्री छापली गेली तरी वर्तमानपत्र लोकांच्या हाती उद्याच पडणार आहे. तोवर तर‌…. ( vikram gokhale news )


पण नियतीने तुमच्या माध्यमातून, डॉक्टरांसह सर्वांचे अंदाज खोटे ठरवले. तिकडे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हाॅस्पीटलमध्ये तुमच्या वर उपचार सुरू असताना इकडे लोक मात्र तुम्ही गेल्याची बातमी वाचत होते. बरं, आम्ही सारे सोशल मीडियातले आधुनिक लढवैय्ये असल्याने एखादी माहिती हाती लागण्याचीच देर, जरासाही वेळ न दवडता ती माहिती पुढे पाठवण्यात हातखंडा लाभलाय आताशा आम्हाला. आता हे खरंय् की, निदान एखाद्याच्या मॄत्यूसंदर्भातील माहितीची तरी शहानिशा करून घ्यायला हवी. पण हे त्या दीडशहाण्या पत्रकारालाच उमजलं नाही, तिथे आमची काय बिशाद? आम्हीही उचलली माहिती अन् करीत गेलो फाॅरवर्ड. कोण किती जास्त फाॅरवर्ड करतो, याची स्पर्धाच असते विक्रमराव, अशावेळी. आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी सोशल मीडियावर अशी लांबच्या लांब रांग लागली असताना, आपण मागे राहून कसं ना चालेल? कुणी मागास ठरवलं तर आपल्याला? त्यामुळे ओळखीचा असो वा नसो, आपला संबंध असो वा नसो, कुणाच्याही निधनाची बातमी दिसली की आरआयपी टाकून मोकळं व्हायचं लागलीच. बऱ्याच जणांनी तर, कोण गेलंय् याची मुख्य माहितीही वाचलेली नसते बऱ्याचदा. आरआयपीचे बरेच मेसेजेस दिसताहेत म्हणजे कुणीतरी गेलंच असणार अशी खात्री बाळगून श्रद्धांजली वाहणारी मंडळीही आहेच जगात.


जाऊ द्या. मिस्टर गोखले! तुम्ही काय कमी टुकार माणसं बघितली असतील इतक्या वर्षात? इतरांच्या खाजगी जीवनाचे खोबरे करीत विमानतळावर सेल्फी साठी तुमच्या भोवती झुंबड घालणारे लोक बघितल्यावर तुमचा होणारा संताप, ती अस्वस्थता बघितली आहे आम्ही. पण त्याच्याशी काडीचा संबंध नसल्यागत बेदरकार वागणारे आणि तुमच्या अस्वस्थतेची किंमत शून्य ठरवणारे लोक…काय करावं या लोकांचं तेच कळत नाही बघा! एखाद्याच्या मॄत्यूची बातमी देतानाही जे लोक संवेदना जपत नाहीत, त्यांच्याकडून काय अपेक्षा बाळगायची? समाजमनाचे भान जपत शहाणपणाने वागण्याची जबाबदारी कुणालाच स्वीकारायची नाही इथे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना कितीवेळा मारलं या लोकांनी? अटल बिहारी वाजपेयी,अमिताभ बच्चन, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर, राजू श्रीवास्तव यांच्या संदर्भातही काय कमी वावड्या उडवल्या गेल्या?


एखाद्याच्या मॄत्यूची बातमी प्रसॄत करण्याची घाई करण्याची खरं तर काहीच गरज नाही. पण, त्यातही मी पहिले माहिती दिली, याचं समाधान, पाठीवरची थाप मिळवण्याच्या धडपडीत आपण दुसऱ्या कुणाच्या समाधानाचं, मानसिक अवस्थेचं वाटोळं करतोय्, याचंच भान सुटत चाललं आहे अलीकडे. सबसे तेजच्या शर्यतीत माणुसकी स्टार्टिंग पाॅईंटलाच स्तब्ध आणि अवघडलेल्या अवस्थेत पडून राहिली आहे, हे लक्षातच येत नाही आमच्या. बरं का, मिस्टर गोखले, तुमच्या बाबतीत चूक एकट्या त्या पत्रकाराचीच नाही हं. आम्ही रसिक, तुमचे चाहते ज्या घाईने श्रद्धांजलीची फुलं उधळायला सरसावलो ना, ते वागणं तरी कुठे शहाणपणाचं होतं? दिसली माहिती की पाठव पुढे, मेला माणूस की वहा श्रद्धांजली, असंच काहीसं होतं ते. आता स्वतःला वाटणारी लाज आरआयपी सारखी संक्षिप्त, मर्यादित शब्दात नाही व्यक्त करता येत. माफ करा मिस्टर गोखले, आम्हाला. आमच्या एकूणच बेताल वागण्याचं तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका! आम्ही तर‌ आमच्या चुकीच्या वर्तनाचे किंचितही वाईट वाटून घेत नाही आताशा. माध्यम जगतात वावरताना आणि समाज माध्यमात शत्रूंवर तुटून पडणाऱ्या सैनिकाची भूमिका पार पाडताना कमालीचे कोडगेपण कमावले आहे आम्ही इतक्या दिवसात. कुणाच्याही मॄत्यूची बातमी कानावर पडली की आरआयपी लिहून मोकळं होण्याइतकं सोप्पं झालंय सगळं…


गेल्या चार दिवसांत झळकलेल्या बातम्या आणि श्रद्धांजलीची अजिबात दखल न घेता नियतीने दीर्घायुष्याचे दान आपल्या पदरी टाकावे, हीच त्या नियंत्याला प्रार्थना!

बेक मँगो योगर्ट आणि बनाना वॉलनट केक | Bake Mango Yogurt & Banana Walnut cake |Epi 40|Shankhnaad News

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा