मुख्यमंत्र्यांसह आमचे ४० रेडे गुवाहाटीला चाललेत-मंत्री गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य

0

जळगाव: शिंदे गटाचे आमदार पुन्हा एकदा गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे गटाचे ४० रेडे गुवाहाटीला जात असल्याची टीका केली होती. आता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनीही आमदारांचा रेडे म्हणून उल्लेख केला आहे. आमचे ४० रेडे दर्शनासाठी गुवाहाटीला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जिल्हा दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावातील मेळाव्यात गुलाबराव पाटील बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील मंत्री आणि आमदार हे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला जाणार आहेत. मात्र, जिल्हा दूध संघाची निवडणूक असल्याने आपण गुवाहाटीला जाणार नसल्याचे गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.


गुलाबराव पाटील म्हणाले की, निवडणूक असल्याने आपण गुवाहाटीला येऊ शकणार नाही, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. त्यामुळे मी गुवाहाटीला जाणार नसून आमचे बाकीचे आमदार जाणार असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांसह 40 रेडे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जात असल्याचे म्हणत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना उपहासात्मक टोला लगावला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येकाने अभ्यास करून बोलले पाहिजे. महामहीम राष्ट्रपती असो की राज्यपाल असोत. राजे राजे आहेत. त्यामुळे राजांवर कोणी बोलू नये असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर टीका केली.