पत्नीसह प्रियकराला अटक : अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने काढला पतीचा काटा
ब्रह्मपुरी. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच खून (Husband killed by his wife with the help of her lover) केला. प्रथेप्रमाणे सर्व सोपस्कार पार पडले. घटनेला सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर मोबाईलमधील एक रेकॉर्डिंग (Mobile recording ) मुलीच्या हाती लागले. त्यातून हत्याकांडाचे बिंग फुटले. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या आरोपी आईसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी रंजना रामटेके आणि मुकेश त्रिवेदी या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, पती श्याम रामटेके यांचा खून केल्याचे सत्य बाहेर आले. रंजना श्याम रामटेके (५०) रा.गुरुदेवनगर ब्रह्मपुरी आणि मुकेश राजबहादूर त्रिवेदी (४८) रा.हनुमान मंदिराजवळ पेठ वार्ड ब्रह्मपुरी अशी आरोपींची नावे आहेत. घटना समोर आल्यानंतर साऱ्यांनाच धक्का बसला आहे. सध्या या हत्याकांडाचीच सर्वत्र चर्चा आहे.
शहरातील आंबेडकर चौकात आरोपी रंजना रामटेके यांचे जनरल स्टोअर्स आहे. त्यालगतच मुकेश त्रिवेदी याचे भाजीपाला व बांगडीचे दुकान आहे. त्यामुळे त्रिवेदी याचे रंजनाच्या घरी नेहमी येणे-जाणे सुरू होते. फिर्यादी मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे शिक्षण बीएससीपर्यंत झाले असून, नागपूर येथे एका मॉलमध्ये काम करत होती. ६ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी तिच्या आईने फोन करून वडील हृदयविकाराच्या धक्क्याने मरण पावल्याचे सांगितले. त्यावेळी दोन्ही बहिणी नागपूर येथे होत्या. वडील वनविभागात क्लार्क पदावरून निवृत्त झाले होते. ६६ वय असल्याने हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सत्य मानून त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. दोन्ही बहिणी परत नागपूरला गेल्या.
अशी पुढे आली घटना
दोन बहिणी आणि आई-वडील असा परिवार ब्रह्मपुरीतील गुरुदेवनगरात राहत होता. मोठी मुलगी नागपूरला होती. घटनेच्या काही महिने आधी लहान मुलीने तिचा मोबाइल आईला दिला. त्यात ती आपला सिम टाकून वापरत होती. वडील मरण पावल्यानंतर आईच्या मोबाइलमधील त्रिवेदी यांच्यासोबत ६ ऑगस्ट, २२ रोजी पहाटे २.१४ वाजता तब्बल १०.५७ मिनिटे बोलल्याची त्यात रेकॉर्डिग आढळली. मुलीने ही रेकॉर्डिंग आपल्या मोबाइलमध्ये ट्रान्स्फर केली. त्यात वडिलांचे हात बांधले, विषारी द्रव्य पाजले आणि उशीने तोंड दाबले, असा उल्लेख आहे. त्रिवेदी याने अंथरूण नीट करून सकाळी सर्वांना पती गेल्याचे सांग, असा सल्ला दिल्याचेही त्या संभाषणात आढळले. यावरून मोठ्या मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली. स्वयंचलित रेकॉर्डिंगमुळे खुनाचे सत्य तीन महिन्यांनी उघडकीस आले.
मुलीने केली आईविरूद्ध पोलिसात तक्रार
आईचे वागणे बदलल्याचे दोन्ही मुलींच्या लक्षात आले. आरोपी मुकेश त्रिवेदी याचे घरी येणे वाढले होते. त्यामुळे समाजात बदनामी होत असल्याने, आईला व त्रिवेदीला मुलींनी समज दिली होती. आई एकटी राहात असल्याने, लहान मुलगी काही दिवसांत ब्रह्मपुरी येथे परत आली. त्यावेळी आईच्या मोबाइलमध्ये असलेल्या एका संभाषण (रेकॉर्ड)वरून आईनेच त्रिवेदी याच्याशी संगनमताने वडिलांचा खून केल्याचे समजताच, मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली.