युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांना रशियानं दिली शिक्षण पूर्ण करण्याची ऑफर

0

नवी दिल्ली : युक्रेन आणि रशियामधील युद्धामुळे युक्रेनमधील हजारो भारतीय विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट सोडून मायदेशी परतण्याची पाळी आली. या दोन देशांमधील संघर्षाला सुरुवात होऊन वर्ष उलटत असले तरी अद्याप संघर्ष संपलेला (Russia-Ukraine Conflict) नाही. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून मायदेशी परतेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. आता या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी रशियाने ऑफर दिली (Russia’s offer to Indian Students) आहे. युक्रेन सोडणारे भारतीय विद्यार्थी रशियामध्ये त्यांचे शिक्षण सुरू पूर्ण करु शकतात. दोन्ही देशांमधील वैद्यकीय अभ्यासक्रम सारखाच आहे. शिवाय, युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने रशियन बोलली जात असल्याने भारतीय विद्यार्थ्यांना रशियामधील लोकांची भाषा समजणे देखील सोपे जाईल, असा तर्क देण्यात येत आहे.
दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी मेडिकल शिक्षणासाठी युक्रेनमध्ये जातात. युक्रेनमध्ये मेडिकल शिक्षण आणि इतर अभ्यासक्रम भारताच्या तुलनेने स्वस्त आहे. भारतात खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधून शिक्षण घेण्यासाठी किमान 80 लाख रुपये खर्च करावे लागतात. मात्र, हाच खर्च युक्रेनमध्ये सुमारे 25 लाख रुपयांच्या आसपास येतो. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तेथील भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणले गेले. पण आता त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता रशियाने भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ऑफर दिली आहे. रशियन कॉन्सुल जनरल ओलेग अवदीव चेन्नईमध्ये आले होते. त्यांनी ही ऑफर दिलीय. युक्रेन सोडणारे भारतीय विद्यार्थी रशियामध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण करु शकतात, असा प्रस्ताव त्यांनी दिलाय. रशिया आणि युक्रेनमधील वैद्यकीय अभ्यासक्रम सारखाच आहे. भारतीय विद्यार्थ्यांना रशियामधील लोकांची भाषा समजणे देखील सोपे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.