मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्धल केलेल्या कथित वादग्रस्त विधानाचे पडसाद उमटणे सुरुच असून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपालांना हटवले गेले नाही तर पक्षभेद बाजूला ठेवून आपण सर्व महाराष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन करू व प्रसंगी आम्ही भारत बंद किंवा मोर्चाचे आयोजन करू, असा इशारा उद्धव ठाकरे (Shiv Sena Leader Uddhav Thackeray on Governor) यांनी दिला आहे. आपण जर शांत बसलो तर आपल्या राज्याच्या अब्रुची लक्तरे या लोकांकडून वेशीवर टांगली जातील. महाराष्ट्रद्रोह्यांना एक खणखणीत इंगा दाखवलाच पाहिजे. मग त्यासाठी महाराष्ट्र बंद करायचा की मोर्चा काढायचा हे आपण ठरवू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र छत्रपती शिवरायांना मानतो. मात्र त्यांचा अपमान झाल्यावर भाजपच्या लोकांकडून गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. केंद्रात ज्यांचे सरकार असते, त्यांच्या विचारांची माणसे राज्यपाल म्हणून नेमली जातात. मात्र या माणसांची कुवत काय असते, या माणसांची पात्रता काय असते? ज्या माणसांना वृद्धाश्रमातही जागा मिळत नाही, त्यांना राज्यपाल म्हणून नेमले जाते का? राज्यपाल नियुक्तीचेही निकष ठरवण्यात आले पाहिजेत. आपल्या राज्यपालांना राज्यपाल म्हणणेच मी सोडून दिले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. कोश्यारींनी याआधीही मराठी माणसांचा अपमान केला होता. या सडक्या मेंदूच्या मागील मेंदू कोण आहे, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.