राज्यपालांवर कारवाईसाठी स्वराज्य संघटनेचे राज्य सरकारला अल्टीमेटम

0

सातारा : राज्यपालांना वेळीच आवर घालून त्यांची हकालपट्टी करा, अन्यथा महाराष्ट्रात एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, असा कडक इशारा छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेने दिला आहे. राज्यासाठी दैवत असलेल्या महापुरुषांच्या अपमान करण्याची मालिकाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लावली असून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना तातडीने दिल्लीला बोलवून घ्या, अन्यथा महाराष्ट्रामध्ये त्यांचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा स्वराज्य संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. कोल्हापुरातील स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. आठ दिवसांत राज्यपालांवर कारवाई न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर याचा उद्रेक बघायला मिळेल आणि याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा स्वराज्य संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

स्वराज्य संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदावर नियुक्त झाल्यापासून महाराष्ट्र, महापुरुष व महाराष्ट्र राज्याची अस्मिता याबाबत वारंवार वादग्रस्त व अवमानकारक वक्तव्ये करत आहेत. त्यांनी शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करून राज्याच्या उज्वल इतिहासाची विटंबना केली आहे. त्यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही हीन वक्तव्य करून या महान दाम्पत्याच्या कार्याची अवहेलना केली आहे. 

कोश्यारी यांना वेळीच आवर घालून त्यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करावी, अन्यथा राज्यातील जनतेचा उद्रेक होऊ शकतो. निवेदनाची दखल घेऊन राज्यपालांना हटवावे, अन्यथा जनआंदोलनातून जे काही परिणाम होतील, त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल. दरम्यान, राज्यपालांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने सरकार राज्यपालांच्या भूमिकेचे समर्थन करते का असा सवाल उपस्थित करत संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी यापूर्वीही आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जाम कोकोनट मफिन्स आणि मशरूम ओनियन पाई | Jam Coconut Muffins & Mushroom Onion Pie Recipe Episode 42