राज्यपाल कोश्यारी यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, काही घटकांकडून नाराजी

0

संभाजीनगर: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे (Bhagat Singh Koshyari). ‘शिवाजी महाराज जुन्या युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. नितीन गडकरीपर्यंत हे नवीन युगाचे हिरो आहेत’ असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संभाजीनगरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 62 वा दीक्षान्त समारंभात बोलताना केल्याने वाद निर्माण झाला आहे. आज संभाजीनगर येथे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डि.लिट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते. यावेळी बोलतांना भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने काही घटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.


राज्यपाल कोश्यारी यावेळी बोलताना म्हणाले की, आम्ही शाळेत जायचो, तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे, तुमचे आवडते नेते कोण आहेत? काहींना सुभाषचंद्र बोस,काहींना नेहरू, काहींना गांधीची चांगले वाटायचे व ते त्या त्या महापुरुषांचे नाव घ्यायचे. महाराष्ट्र नवरत्नांची खाण आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असे कोश्यारी म्हणाले. राज्यपाल म्हणाले, गडकरी आणि पवार यांना पदवी देण्याचे मला भाग्य लाभले. या नेत्यांचं कार्य राष्ट्राला उपयोगी असल्याने त्यांना ही पदवी दिली गेली. मात्र त्यांचे कार्य त्यापेक्षा अधिक आहे. शरद पवार यांनी शेती क्षेत्रात प्रचंड काम केलेय. त्यामुळे ते साखरेपेक्षा अधिक गोड वाटतात. नितीन गडकरी तर ध्येय असणारे नेते आहेत, त्यांना रोडकरी या नावानेही ओळखले जाते. दोन्ही नेत्यांचे मोठे काम आहे, असेही राज्यपाल म्हणाले.