भारतात १६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकारिता दिन साजरा करण्यात येतो.
या राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने वृत्तपत्रांचा इतिहास थोडक्यात पाहणे उचित ठरेल. जर्मनीतील जॉन गटेंबर्ग याने १४५० साली छपाई यंत्राचा शोध लावला. त्यानंतर जवळपास ५९ वर्षांनी म्हणजेच १६०९ मध्ये जर्मनीतच जॉन कार्लोस याने “रिलेशन” हे पहिले वृत्तपत्र प्रकाशित केले.
भारतात ब्रिटिश सत्तेच्या उदयानंतर जेम्स ऑगस्टस हिकी या इंग्रजाने ‘बेंगॉल गॅझेट’ हे पहिले साप्ताहिक इंग्रजी वृत्तपत्र कलकत्यात १७८० मध्ये सुरू केले. त्यापुढे ४२ वर्षांनी बाळशास्त्री जांभेकर यांनी “दर्पण” हे मराठी वृत्तपत्र १८३२ साली सुरू केले.त्यामुळे मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक हा मान बाळशास्त्री जांभेकर यांच्याकडे जातो. साधारणतः त्याच सुमारास हिंदी व अन्य भारतीय भाषांतून वृत्तपत्रे प्रसिध्द होऊ लागली.या वृत्तपत्रांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अतुलनीय आहे.तो अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे.असो.
पुढे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. २६ जानेवारी १९५० रोजी भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झाले.भारतीय राज्य घटना अस्तित्वात आली.लोकशाही राज्य व्यवस्था स्वीकारल्याने ,
लोकशाहीच्या दृष्टीने आवश्यक त्या नवनवीन सुधारणा होऊ लागल्या. विविध प्रकारच्या संस्था,आयोग स्थापन करण्यात आले.
यापैकी एक आयोग म्हणजे १९५६ साली स्थापन करण्यात आलेला पहिला वृत्तपत्र आयोग होय. पत्रकारितेतील मूल्ये, विकास,नियमन यासाठी या आयोगाने केलेल्या शिफारशी लक्षात घेऊन भारत सरकारने
४ जुलै १९६६ रोजी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना केली. सर्व तांत्रिक, कायदेशीर व प्रशासकीय उपचार पूर्ण होऊन १६ नोव्हेंबर १९६६ रोजी प्रेस कौन्सिलचे कामकाज विधिवत सुरू झाले. त्यामुळे १६ नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय पत्रकारिता दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
राष्ट्रीय पत्रकार दिनी पत्रकारितेची मूल्ये, कर्तव्ये, जबाबदारी, हक्क, पत्रकारितेचे स्वातंत्र्य अशा अनेक विषयांवर देशभर विविध कार्यक्रम, परिसंवाद,चर्चासत्रे, उपक्रम आयोजित करण्यात येतात.
राष्ट्रीय पत्रकारिता दिन साजरा करण्याच्या फार आधी पासूनच
महाराष्ट्रात ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात येत असल्याने राष्ट्रीय पत्रकारिता दिवस
महाराष्ट्रात फारसा प्रभावीपणे साजरा होत असल्याचे दिसत नाही. अर्थात महाराष्ट्रात पहिला पत्रकार दिन कधी,कुठे ,कसा साजरा झाला,याची निश्चित माहिती उपलब्ध नाही. कुणाकडे ही माहिती असल्यास ती त्यांनी मला जरूर द्यावी,अशी या निमित्ताने विनंती आहे.
आज केवळ वृत्तपत्रेच नव्हे तर ,आकाशवाणी, दूरचित्रवाणी वाहिन्या, समाज माध्यमे असे विशाल रूप पत्रकारितेने धारण केले आहे. दिवसेंदिवस तंत्रज्ञान बदलतच चालले आहे. त्याचा समाज जीवन, मानवी नातेसंबंध यावर प्रचंड परिणाम होत आहे.केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगाचे माध्यम विश्व ढवळून निघत आहे. या सर्व परिस्थितीत उद्याची पत्रकारिता कशी असेल ? या बाबत विचार मंथन होणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छालेखन:देवेंद्र भुजबळ
निवृत्त माहिती संचालक