मुंबईः स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्धल राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला असतानाच हिंदु महासभेने आता राहुल गांधी यांना कोंडीत पकडले आहे.माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा एका पत्रात धाडसी म्हणून उल्लेख केला (Indira Gandhi`s letter praising Vir Savarkar). त्यांच्या जन्मशताब्दीबद्दल स्वतःच्या खात्यातून देणगीही दिली होती, अशी माहिती हिंदु महासभेने उघड केली असून हे काम इंदिरा गांधी यांनी कोणाच्या दबावाखाली केले होते काय, राहुल गांधी यांनी आपल्या आजीचे ते पत्र वाचले नाही का, असे प्रश्न हिंदू महासभेने उपस्थित केले आहेत. भाजपने देखील या पत्राचे दाखले देत राहुल गांधी यांच्यावर आज निशाणा साधला.
सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली, असा दावा गुरुवारी पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी जाहीरसभेत केला होता. त्यावर हिंदू महासभेने जोरदार आक्षेप नोंदवत इंदिरा गांधी यांचे एक जुने पत्र समोर आणले. हिंदु महासभेचे आनंद दवे यांनी इंदिरा गांधी यांची स्वाक्षरी असलेले एक पत्र पुढे आणले आहे. २० मे १९८० रोजी लिहिलेेल्या पत्रात इंदिरा गांधी यांनी स्वा. सावरकरांच्या कर्तृत्वावर बोलताना त्यांचा धाडसी असा उल्लेख केला आहे. सावरकरांच्या जन्मशताब्दीबद्दल स्वतःच्या खात्यातून अकरा हजार रुपयांची देणगीही त्यांनी प्रतिष्ठानला दिली होती. त्यांनी हे कृत्य कोणाला घाबरून केले होते का, असा सवालही दवे यांनी राहुल गांधी यांना केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या आजीने लिहिलेले पत्र वाचले नाही काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
