राहुल गांधींच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, सावरकरांबद्धल आदरच-उद्धव ठाकरेंचा दावा

0

मुंबई : “राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. ते चुकीचेच बोलले आहेत. आमच्या मनात सावरकर यांच्याविषयी आदरच आहे,” असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray on Rahul Gandhi Statement) यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांशी बोलताना केला. दरम्यान, राहुल गांधी यांच्या सावरकरविरोधी वक्तव्यावरून कात्रीत सापडलेल्या ठाकरे गटाने राहुल गांधी यांच्या शेगाव येथील जाहीरसभेला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नाहीत, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने प्रसार माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आम्ही राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचा दावा केला. सावरकरांविषयी आमच्या मनात आदरच असल्याचे ते म्हणाले. सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा उपस्थित केला याचा मला आनंद आहे. पण ज्यांचा स्वातंत्र्याशी काडीचाही संबंध नाही त्यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल बोलूच नये. तुम्ही काय केलंत? पाकिस्तानातील किती जमीन तुम्ही राज्यात आणली? तुम्ही काश्मीरमध्ये सत्तेसाठी काय केले? लोकांना उगाच संभ्रमित करु नका, असेही ते म्हणाले.
संघावरही ठाकरेंची टीका
स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी तर आमची संघटनाही नव्हती. परंतु जे होते त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नाही. त्यामुळे त्यांच्या पिल्लांनी सावरकरांबद्दल प्रेम व्यक्त करणे हास्यास्पद आहे. स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केला. तेच स्वातंत्र्य आता धोक्यात आलेले आहे, अशी मुक्ताफळे देखील उद्धव ठाकरे यांनी उधळली.

ठाकरे सभेला जाणार नाहीत
दरम्यान, शेगाव येथे होणाऱ्या राहुल गांधी यांच्या जाहीरसभेसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यापैकी कोणीही जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा