राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद, सावरकरांचे गावही बंद

0

मुंबई, 18 नोव्हेंबर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजप आक्रमक झाली आहे. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. पुण्यासह, बीड, ठाणे, अमरावती, नाशिक जिल्ह्यात भाजपकडून राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या तसेच पुण्यात पंडित जवाहरलाल नेहरुंनी सावरकरांची माफी मागितल्याचे पोस्टर लावण्यात आले.

पुण्यात काँग्रेसभवनसमोर जोरदार राडा

पुणे काँग्रेस भवनातील भारत जोडो याञा वाहनावरील राहुल गांधी यांच्या फोटोलाही काळ फासलं. तसच नेहरू  यांनीही माफी मागितल्याचे पोस्टर लावले होते ते सर्व पोस्टर काँग्रेस कार्यकर्त्यांनी लगेच काढूनही टाकले. पुणे पोलिसांनी याप्रकरणी 15 भाजप कार्यकर्ते ताब्यात घेतले आहेत. दरम्यान काही काळ जोरदार घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.

सावरकरांचे गाव बंद

सावरकर यांच्या नाशिक येथील मुळ गावी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात पूर्णपणे बंद पाळण्यात आला. सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूरमध्ये आज सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध करण्यात आला. भगूर मधील बाजारपेठा आणि इतर सर्व दुकान आज बंद ठेवण्यात आले आहेत. बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा देखील बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बीडमध्ये राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद बीडमध्ये पहायला मिळाले. बीडच्या माजलगाव शहरात बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिवसैनिकांनी गाढवाच्या गळ्यात बुटचपल्लाचा हार घालून जोडे मारून निषेध व्यक्त केला. काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.