रेल्वेला 35 हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश

0

ग्राहक मंचाचा आदेश : तिकीट असतानाही उकळला होता 1,150 रुपयांचा दंड


नागपूर. नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे (Duranto Express) कन्फर्म ई-तिकीट असताना एका महिलेला विनातिकीट प्रवास करीत असल्याबद्दल 1 हजार 150 रुपयांचा दंड करण्यात (woman was fined) आला होता. यासंदर्भात महिलेने ग्राहक मंचकडे (customer forum) धाव घेतल्यानंतर मध्य रेल्वेला 35 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश (Order to pay compensation) ग्राहक मंचाने दिले आहे. स्थानिक रहिवासी आर. श्रीदेवी यांना 14 फेब्रुवारी 2020 या दिवशी नागपूर-मुंबई दुरांतोने प्रवास करण्यासाठी 2 नोव्हेंबर 2019 रोजी ऑनलाइन ई-तिकीट काढले होते. 4 महिन्यांपूर्वीच कन्फर्म तिकीट काढले असताना टीसीने हे तिकीट अवैध असल्याचे सांगून महिला प्रवाशांकडून दंड वसूल केला होता. प्रवासाचे ई-तिकीट काढताना त्यांनी आपल्या वैयक्तिक आयडीचा उपयोग केला होता. त्यानुसार त्यांना एस-7 कोचमध्ये 57 क्रमांकाचा बर्थ मिळाला होता.
गाडी वर्धा स्टेशनजवळ असताना त्यांच्याकडे आलेल्या टीसीने श्रीदेवी यांना तिकीटाबद्दल विचारले. टीसीला ई-तिकीट दाखविल्यानंतर हा बर्थ दुसऱ्याच प्रवाशाच्या नावाने असल्याचे टीसीने सांगितले. यामुळे महिला प्रवासी श्रीदेवी यांना धक्काच बसला. टीसीजवळ असलेल्या यादीत महिलेचे नाव नसल्याने त्या विनातिकीट प्रवास करीत असल्याबद्दल टीसीने दंड ठोठविला होता. त्यांना बर्थ रिकामा करण्यासही सांगितले. तेव्हा रात्रीची वेळ, प्रवास करणारी महिला एकटीच होती. विनातिकीट प्रवास करीत असल्याचा दंड दिल्यानंतर या महिलेस खाली बसूनच प्रवास करावा लागला होता.

रेल्वेतील भोंगळ कारभार
प्रवास झाल्यानंतर नागपूर येथील मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे या संपूर्ण प्रकाराची तक्रार श्रीदेवी यांनी केली. मात्र रेल्वेने झालेल्या प्रकाराबद्दल केवळ दिलगिरी व्यक्त केली. रेल्वेतील या भोंगळ कारभाराबद्दल कोणतीही नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. त्यामुळे श्रीदेवी यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत ग्राहक मंचने श्रीदेवी यांना न्याय मिळवून दिला. नुकसानभरपाई म्हणून 25 हजार , न्यायिक खर्चासाठी 10 हजार असे 35 हजार रुपये रेल्वेने द्यावे, असे ग्राहक मंचाने आपल्या आदेशात म्हटले आहे. या प्रकरणात श्रीदेवी यांची बाजू वकील डॉ. महेंद्र लिमये यांनी मांडली. तर ग्राहक मंचचे सदस्य अतुल आळशी, चंद्रिका बैस व सुभाष आजने आदींनी यासाठी परिश्रम घेतले.