लोकसहभागातून शहर हत्तीरोगमुक्त करूया: राधाकृष्णन – पहिल्या अभिनव प्रकल्पाची आयुक्तांच्या हस्ते सुरुवात

0

नागपूर :नागपूर शहर हत्तीरोगमुक्त करण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रयत्नरत आहेत. संपूर्ण शहर हत्तीरोगमुक्त करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक असून, लोकसहभागाने हत्तीरोगमुक्त नागपूर साकारता येईल असा विश्वास व्यक्त करीत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी हत्तीरोगग्रस्तांना विशेष पादत्राणे वितरण करणाऱा देशातील पहिला अभिनव उपक्रम सुरु केला आहे.


नागपूर महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिल्या हत्तीरोगग्रस्तांना विशेष पादत्राणांचे वितरण प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहा. सहसंचालक आरोग्य सेवा (हिवताप व हत्तीरोग) डॉ. निमगडे, WHO समन्वयक डॉ. भाग्यश्री त्रिवेदी, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जास्मीन मुलानी, रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊनचे अध्यक्ष डॉ. विकास इंगळे, विवेक देशपांडे, पात्रीकर यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते.


मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते हत्तीरोगग्रस्त रुग्णांसाठी विशेष पादत्राणांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये MMDP क्लिनिक सुरू करणारी नागपूर महानगरपालिका ही संपूर्ण महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे. हत्तीरोग हा जीवघेणा आजार नसला तरी यामुळे कायमचे अपंगत्व येऊ शकते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जास्मीन मुलानी यांनी केले. त्या म्हणाले की, हत्तीरोग ग्रस्त रुग्णांची संख्या ही चंद्रपूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यांपैकी अधिक आहे. सध्या नागपुरात हत्तीरोगाचे ८३७ रुग्ण आहेत.