विनयभंगाच्या गुन्ह्यातही महिला ठरली दोषी, न्यायालयाचा निर्णय

0

मुंबईः मुंबईच्या न्यायालयाने एका महिलेस विनयभंगाच्या आरोपात (Molestation Case against woman) दोषी ठरवले असून तिला वर्षभराच्या कारावासाची शिक्षा तसेच 6 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पुरुषांप्रमाणेच महिलेकडूनही दुसऱ्या महिलेचा विनयभंग होऊ शकतो व तो करण्याच्या हेतूने बळाचा वापर करून किंवा तिला मारहाण झाली असेल तर आरोपी महिलेलाही विनयभंगाच्या आरोपांतर्गत दोषी ठरवता येऊ शकते, असे माझगाव न्यायालयाने स्पष्ट केले आहे. एखाद्या स्त्रीला या आरोपांतून वगळण्यात यावे, असे कायद्यात कुठेही नमूद करण्यात आलेले नाही, असा निर्वाळा देखील न्यायालयाने दिलेला आहे. जारी राहणाऱ्या दोन महिलांमध्ये झालेल्या भांडणात एकीने दुसरीला मारहाण करून तिचे कपडे फाडल्याच्या प्रकरणात महानगरदंडाधिकारी न्यायालयाने हा निकाल दिला आहे.


यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार महिलेच्या कुटुंबियांमध्ये मागील अनेक वर्षांपासून वाद सुरु होता. त्यातच दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणात आरोपी महिलेने तक्रारदार महिलेवर आधी चप्पल फेकली  व नंतर तिला चपलेने मारहाण केली. आसपासच्या लोकांनी त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने आपला गळा पकडून शिवीगाळ केली व आपले कपडे फाडल्याची तक्रार पीडीत महिलेने पोलिसांकडे दिली होती.

आरोपी महिलेने आपल्याला मारहाण करून विनयभंग केला. तसेच तर भांडणात तिने आपल्या पतीला माझ्यावर बलात्कार करण्यासही सांगितले होते. यावेळी इमारतीतील सर्व पुरुष तेथे उपस्थित होते, असेही तक्रारदार महिलेने पोलीस तक्रारीत म्हटले होते.  दरम्यान, ही तक्रार साक्षीपुरव्याद्वारे सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी महिलेस विनयभंगाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले. महिलेकडूनही एखाद्या महिलेवर विनयभंग करण्याच्या हेतूने बळाचा वापर करून किंवा तिला मारहाण करण्यात येत असेल तर महिलेलाही विनयभंगाच्या आरोपांतर्गत दोषी ठरवता येऊ शकते, असे स्पष्ट करत न्यायालयाने आरोपीला विनयभंगाच्या आरोपाखाली दोषी ठरवले. मात्र आरोपी महिला तीन मुलांची आई असल्यामुळे तिला न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा व 6 हजार रुपयांचा दंडही ठोठावला.