विनायक मेटे अपघाती मृत्यू प्रकरणी सीआयडीचा चालकाविरुद्ध ठपका, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

0

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी (Vinayak Mete Car Accident) अखेर गुन्हा दाखल झालाय. मेटे यांचा कार चालक एकनाथ कदम याच्याविरोधात रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघााचा तपास करणाऱ्या राज्य सीआयडीने कलम 304 अंतर्गत हा गुन्हा दाखल केला असून लवकरच कदम याला चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती सीआयडीच्या सूत्रांनी दिली आहे. विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा घटनास्थळीच दुदैवी मृत्यू झाला. या अपघाताची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पुढे आली होती. त्यामुळे राज्य सरकारने या अपघाताचा तपास सीआयडीकडे सोपविला होता.


सीआयडीने या प्रकरणाचा सखोल तपास केला. मेटे यांची कार ज्या-ज्या मार्गावरुन गेली होती, तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेजही सीआयडीकडून तपासण्यात आले. याशिवाय आयआरबीचे अभियंत्यांचे एक पथक तयार करुन त्यांची मतेही जाणून घेण्यात आली. सीआयडीने पाहिलेल्या फूटेजमध्ये चालक एकनाथ कदम हा ताशी 120 ते 140 किमी वेगाने गाडी चालवत असल्याचे दिसून आले. ज्या ठिकाणी अपघात झाला, त्याच्या काही अंतर आधी चालक कदमने उजवा टर्न घेऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याला ओव्हरटेक करता येणार नाही, हे माहिती असूनही त्याने ओव्हरटेक केले आणि त्याचा परिणाम म्हणून अपघात घडला, असा निष्कर्ष सीआयडीने काढला आहे. यानंतर चालक कदम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनीही मेटेंच्या वाहन चालकावर संशय घेत त्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. विनायक मेटे यांचा चालक वेगवेगळा जबाब देतोय, असा आरोप मेटेंच्या भाच्याने केला आहे.

पनीर बटर मसाला आणि आटा समोसा | Paneer Butter Masala & Atta Samosa Recipe | Epi 34 | Shankhnaad News