वैश्विक अधिकारासाठी शुद्ध चिकित्सा आवश्यक
-डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

0

आयुर्वेद व्यासपीठ चर्चासत्राचा थाटात शुभारंभ
नागपूर, १२ नोव्हेंबर भारतीय जनमानसात आता आयुर्वेदाचे प्रचलन वाढले आहे, त्यात सुलभता आणून वैद्यांनी शुद्ध चिकित्सा पद्धत अवलंबिल्यास भारताबाहेर वैश्विक अधिकार व मान्यता मिळेल असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. आयुर्वेद व्यासपीठच्या रजत जयंती पर्वाचे औचित्य साधत केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने त्रिदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयुष विभागाचे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, इंडियन मेडिकल कौन्सिलचे जयंत देवपुजारी, संस्थापक अध्यक्ष विनय वेलणकर, राष्ट्रीय अध्यक्ष रजनी गोखले, उपाध्यक्ष शिरीष पेंडसे, कार्यवाह विलास जाधव, कोषाध्यक्ष आनंद टेभूर्णीकर, आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा, माजी अध्यक्ष संतोष नेवापुरकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. मोहनजी भागवत यांनी, मागील २५ वर्षात आयुर्वेद व्यासपीठाने उत्तम काम केले. ज्या गुणांमुळे आपणास मान्यता मिळाली ते सदैव लक्षात ठेवा, आता आयुर्वेदाला जनतेची व शासनाची मान्यता मिळाली. त्यातील सदगुणांचा विसर पडू देऊ नका आणि इतर चिकित्सा पद्धतींमध्ये आलेल्या अहंकाराला आयुर्वेदाच्या मुलतत्वांवरील संशोधनाच्या माध्यमातून उत्तर द्या व जनतेने त्याचा अंगिकार करावा अशी स्थिती निर्माण करा त्यातून वैश्विक अधिकार प्राप्तीचा मार्ग मोकळा होईल असा सल्ला दिला. प्रास्ताविकातून राष्ट्रीय अध्यक्ष वैद्य रजनी गोखले यांनी, मागील २५ वर्षात आयुर्वेद व्यासपीठाने सेवा, संशोधन, प्रचार व प्रसार या चतु:सुत्रीवर काम केले असल्याचे सांगत, आता वैद्य आणि जनतेच्या माध्यमातून आयुर्वेदाला राजमान्यता मिळविण्याचा प्रयत्न आहे, त्यासाठी सर्व राज्यात आयुर्वेद व्यासपीठाची शाखा असावी हा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, आयुर्वेदाचे वैद्य कोणत्याही समस्येवर मात करु शकतात. त्या विचारधारेतूनच यश हमखास मिळणार आहे. देशात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर खèया अर्थाने आयुर्वेदाला अच्छे दिन आले असल्याचे सांगितले. येत्या काळात आयुष मंत्रालयाने आयुर्वेद वैद्यांनी विमा दाव्यांचा निपटारा अग्रक्रमाने करावा असे आवाहन केले. यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी, आयुर्वेद ही पूर्वजांनी दिलेली परंपरा म्हणून आपण सांभाळीत आहोत. आता त्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली, योगा देखील जगाने स्वीकारला. आता जागतिक आरोग्य संघटनेने पारंपरिक चिकित्सा पद्धतीवर काम सुरू केले आहे ही बाब अभिमानास्पद असल्याचे सांगितले. पुष्पगुच्छ आणि विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन उपस्थित पाहुण्याचे स्वागत करण्यात आले.
यानंतर एकूण ९ आयुर्वेद ग्रंथांचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयुर्वेद व्यासपीठच्या पहिल्या कार्यकारीणीतील सदस्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच त्यावेळी पूर्णकालीन कार्यकर्ते म्हणून काम करणारे गिरीश किल्लू, राहुल पालवे, अनिल गुप्ता, अमेय भावे, सुविनय दामले, विवेक कुळकर्णी, उमेश तागडे यांचा यथोजित गौरव करण्यात आला.
नितीन गडकरी यांच्‍या उपस्थितीत आज ‘आयुर्वेद पर्व’चा समारोप
आयुर्वेद व्‍यासपीठच्‍या तीन दिवसीय आयुर्वेद पर्वचा समारोप रविवार, 13 नोव्‍हंबर रोजी सकाळी 11.30 वाजता होत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक अणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांची प्रमुख उपस्‍थ‍िती राहील.
शनिवारी आयुष मंत्रालयाचे वैद्य श्री कौस्तुभ उपाध्याय हयांच्या उपस्थितीत आयुर्वेदीय औषधी निर्मात्यांचे सम्मेलन पार पडले. सोबतच जानुसंधि परीक्षण विषयावर वैद्य मंगेश देशपांडे, आयुर्वेदातील आपात्‍कालीन उपचार वर वैद्य उपेंद्र दीक्षित व वैद्य गोपिकृष्‍णन तर आयुषची उपलब्‍धी विषयावर पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा यांची कार्यशाळा पार पडली. वन्‍ध्‍यत्‍व विषयावर वैद्य अनुप ठाकूर, वैद्य महेश मुळे, वैद्य नीता म्‍हैसेकर यांचे मार्गदर्शन लाभले. आयुर्वेदाची प्रॅक्‍टीस विषयावर झालेल्‍या समांतर सत्रात वैद्य राकेश शर्मा व वैद्य आशुतोष गुप्‍ता यांनी मार्गदर्शन केले. आरोग्‍य प्रदर्शन बघण्‍यासाठी दिवसभर विद्यार्थी व नागरिकांनी गर्दी केली. आमदार प्रवीण दटके यांनीही प्रदर्शनीला भेट दिली. बाह्य रुग्‍ण विभागातही आयुर्वेदिक उपचारांसाठी रुग्‍णांची गर्दी बघायला मिळाली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा