व्यापाऱ्यांकडून तब्बल ३.९० लाख क्विंटल सोयाबीन खरेदी

0

हमीभावापेक्षा अधिक दराने खरेदी, शेतकऱ्यांना दिलासा पण सोयाबीन महागणार


वर्धा. यंदाच्या वर्षी सोयाबीनला (soybeans) ४ हजार ३०० रुपये हमी भाव देण्यात आला आहे. असे असले तरी हमीपेक्षा जास्त भाव खासगी व्यापाऱ्यांनी यंदा सुरुवातीपासूनच दिला. परिणामी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांनी आतापर्यंत तब्बल ३ लाख ९० हजार १५६.०२ क्विंटल सोयाबीन खासगी व्यापाऱ्यांना विकल्याचे (Sold to private traders) वास्तव आहे. त्याबाबतची नोंदही घेण्यात आली आहे. अन्य ठिकाणीही व्यापाऱ्यांकडूनच सोयाबीन खरेदी केली जात आहे. अधिक दर मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे. पण, त्यामुळे सोयाबीन व पर्यायाने सोयाबीनपासून निर्माण होणाऱ्या तेलासह अन्य साहित्यही महागण्याची शक्यता वर्तविली (Products made from soybeans are also likely to be expensive) जात आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. तर नंतर पावसाने आपला जोर काय ठेवल्याने यंदा समाधानकारक उत्पन्न होण्याची आशा असतानाच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील आठही तालुक्यात वेळोवेळी अतिवृष्टी झाली. यामुळे उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला.


असे असले तरी अतिवृष्टीच्या संकटातून बचावलेल्या सोयाबीन पिकांची शेतकऱ्यांनी योग्य निगा घेतल्याने यंदा हेक्टरी सरासरी पाच क्विंटलचा उतारा राहिला. अशातच सोयाबीन बाजारपेठेत येत असतानाच खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमी भावापेक्षा जास्तच भाव देण्यात आल्याने जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांनीही खासगी व्यापाऱ्यांना सोयाबीन देण्यास प्राधान्य दिले. आतापर्यंत जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नोंदणीकृत व्यापाऱ्यांनी तब्बल ३ लाख ९० हजार १५६.०२ क्विंटल सोयाबीन खरेदी केली आहे.


मागील वर्षी हमीभाव होता ३,९५० रुपये


यंदाच्या वर्षी सोयाबीनला ४ हजार ३०० रुपये हमीभाव देण्यात आला असला तरी मागील वर्षी सोयाबीनला ३ हजार ९५० रुपये हमी भाव देण्यात आला होता. गत वर्षीच्या तुलनेत सोयाबीनच्या हमीभावात ३५० रुपयांची वाढ असली तरी खर्चाच्या तुलनेत तो अल्प असल्याचे वयोवृद्ध शेतकरी सांगतात.


१.२३ लाख हेक्टरवर झाली होती पेरणी


यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील आठही तालुक्यात १ लाख २३ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. तर आतापर्यंत ३.९० लाख क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना विक्री केले आहे.


कुठल्या बाजार समितीत किती खरेदी?


-वर्धा : ९९५५ क्विंटल
-पुलगाव : ६५२५.४५ क्विंटल
-आर्वी : १९६४९.०१ क्विंटल
-आष्टी : १९३३०.५६ क्विंटल
-सिंदी : ४७१४१ क्विंटल
-समुद्रपूर : १११२ क्विंटल
-हिंगणघाट : २८६४४३ क्विंटल