व्हीएससी चषक वॉलीबॉल स्पर्धा 23 पासून
भद्रावतीत महाआयोजन

0

भद्रावती. विवेकानंद स्पोर्टिंग क्लबला (Vivekananda Sporting Club) 25 वर्षे पूर्ण होत आहेत. रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त विवेकानंद स्पोर्टिंग क्लब व विवेकानंद महाविद्यालय भद्रावती (Vivekananda College Bhadravati ) यांच्या संयुक्त विद्यमाने विवेकानंद स्पोर्टिंग क्लबयेथे महाराष्ट्र वॉलीबॉल संघटनेच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्यस्तरीय सब ज्युनिअर गट आंतर विभागीय वॉलीबॉल स्पर्धेचे (State level volleyball tournament ) महाआयोजन कण्यात आले आहे. मुले व मुलींचे संघ 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान खिताबासाठी लढत देतील. विवेकानंद महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर दिवस-रात्र हे सामने होणार आहेत. क्रीडाप्रेमींसाठी ही स्पर्धा पर्वणीच ठरणारी आहे. स्पर्धेच्या निमित्ताने प्रतिभावंत खेळाडूंचा खेळ उदयोन्मुख खेळाडूंना जवळून बघता येणार आहे. स्पर्धेकरिता विद्युत प्रकाश झोतातील दोन मैदाने सज्ज असून स्पर्धा ही दिवस-रात्र सत्रात खेळविले जाणार आहे.


या विएससी चषक स्पर्धेतून महाराष्ट्र संघ निवडला जाणार आहे. निवड झालेला संघ पुढील राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धे करता भद्रावतीतूनच रवाना होईल, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे .या विएससी चषक स्पर्धेकरिता आठ विभागातील कोल्हापूर विभाग, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद, लातूर, अमरावती विभाग व यजमान नागपूर विभाग यांचे मुला मुलींचे संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेकरिता 250 खेळाडूंसहित पदाधिकारी पंच सहभागी होत आहे. महाराष्ट्र वॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतीक पाटील व सचिव विरल शहा यांच्या मार्गदर्शनात स्पर्धा यशस्वी करण्याकरिता विवेकानंद स्पोर्टिंग क्लब व विवेकानंद महाविद्यालय भद्रावतीचे राजेश मते, रवींन तेलतुंबडे, दिनेश गोडे, समीर बलकी, आदर्श आशुटकर, प्राचार्य नामदेव उमाटे आदी परिश्रम घेत आहे. सोबतच या स्पर्धेचा एक भाग म्हणून सहा नोव्हेंबरला नागपूर विभागीय संघाची निवड चाचणीसुद्धा विवेकानंद महाविद्यालय स्पोर्टिंग क्लब च्या वतीने घेऊन नागपूर विभागीय मुले व मुलींच्या संघाची निवड करण्यात आली आहे.