शस्त्रक्रियेद्वारे मिरगी विकारावर नियंत्रण मिळविणे शक्य
राष्ट्रीय मिर्गी दिवस विशेष छ लहानग्यांचे जीवनमान सुधारण्यास होईल मदत

0

नागपूर. मिरगी विकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता खालावते.लहानपणापासून मिरगीचा विकार असेल व्यक्तिमत्त्व विकासात अडथळा निर्माण होऊ शकतो. रोजची कामे करण्यात अडथळे येतात. अशा रुग्णांना आयुष्यभर मिरगीच्या औषधांवर जीवनमान व्यतीत करावे लागू शकते. जनसामान्यांना मिरगी हा आजही असाध्य आजार वाटतो. मात्र, मिरगी या विकारावर मात्र आता आधुनिक निदान पद्धती व औषधोपचार आणि शस्त्रक्रियेने पूर्ण मात करणे शक्य आहे, अशी माहिती नागपूरचे प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. अक्षय पाटील यांनी दिली. मिरगी या विकारावर शस्त्रक्रियेने मात करता येते, याबद्दल समाजात फारशी जागृती नाही. २०१६-१७ च्या आकडेवारीनुसार भारतात जवळपास ५० लाख मिरगीचे रुग्ण असू शकतात. त्यापैकी ५ लाख रुग्ण औषधोपचार घेत आहेत. त्यापैकी दोन लाख रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र आहेत. मात्र, दरवर्षी केवळ २ ते ३ हजार मिरगी संबंधित शस्त्रक्रिया होतात. याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. १७ नोव्हेंबर राष्ट्रीय मिरगी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
मिरगी दोन प्रकारची असते. पहिली म्हणजे फोकल अर्थात शरिराच्या एखाद्या अंगाला मिरगी येणे, दुसरी म्हणजे जनरलाईज म्हणजेच पूर्ण अंगाला मिरगी येऊन शुद्ध हरपणे; दोन्हीची कारणे भिन्न असतात. दोन किंवा अधिक औषधे घेऊनही मिरगीवर नियंत्रण मिळत नाही किंवा ज्यांना औषधांचे दुष्परीणाम होत आहे, अशा रुग्णांच्या मिरगीच्या विकाराला ‘मेडिकली रिफ्रॅटरी एपीलेप्सी’ असे म्हणतात. या रुग्णांचे व्यवस्थित निदान करून शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. शस्त्रक्रियेद्वारे फोकल एपिलेप्सी पूर्णपणे बरी होऊ शकते आणि औषधेही कालांतराने बंद केली जाऊ शकतात. पण, जनरलाईज एपिलेप्सीमध्ये शस्त्रक्रियेने मिरगीची तीव्रता वा वारंवारिता कमी करता येऊ शकते.
या आजाराला फिट, आकडी किंवा अपस्मार म्हणूनसुद्धा ओळखले जाते. अचानक शुद्ध हरपणे, फार थोड्या वेळेसाठी अपंगत्व येणे किंवा काही कारण नसताना शरिराचा, हात- पायाचा थरकाप उडणे, ही नेहमी दिसणारी याची सामान्य लक्षणे आहेत.

शस्त्रक्रिया लवकर झाल्यास फायदा
लहानपणी त्वरीत निदान करून मिर्गीवरील शस्त्रक्रिया केल्यास मेंदुच्या वाढीस मदत होते व पुढे जाऊन अडचणी कमी होतात. औषधांवरील अवलंबित्व आणि पर्यायाने दुष्परिणाम कमी होतात. त्यामुळे पुढे शाळेत नियमित जाणे, पुढे रोजगार मिळवणेही शक्य होऊ शकते.
डॉ. अक्षय पाटील, न्युरोसर्जन, नागपूर

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा