शासकीय दवाखान्यांत ‘पीसीव्ही’ लसीचा तुटवडा

0

पालकांची शहरभर पायपीट ः खासगीत उकळले जातेच 4 ते 5 हजार रुपये


नागपूर. न्युमोकोकल आजारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी (protect children from neumococcal disease) दिल्या जाणाऱ्या पीसीव्ही लसीचा सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये तुटवडा (Shortage of PCV vaccine in government hospitals ) निर्माण झाला आहे. बालकाला ही लस मिळावी यासाठी पालकांची वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये पायपीट सुरू आहे. पण, लस मिळतच नसल्याने संताप व्यक्त होतो (Anger is expressed by parents) आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शासकीय रुग्णालयात तुटवडा असलेली ही लस खासगी रुग्णालयांमध्ये सहज उपलब्ध आहे. पण, त्यासाठी 4 ते 5 हजार रुपये आकारले जात आहे. गरीबांनी महाग लस द्यावी कशी, गरीबांच्या मुलांना जगण्याचा अधिकार नाही काय?, अशा जळजळीत प्रश्नांसह पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत गत वर्षीच पीसीव्ही लसीचा समावेश करण्यात आला आहे. थंडीत बाळांना न्युमोकोकल आजारांचा धोका अधिक असतो. यामुळे लस देण्याची सूचना डॉक्टरांकडून केली जात आहे. ती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण, नागपूर शहरातील प्रत्येकच सरकारी रुग्णलय व लसीकरणाची सुविधा असणाऱ्या दवाखान्यांमध्ये लसीचा तुटवडा असून बालकांना घेऊन येणाऱ्या पालकांना आल्या पावली परतावे लागत आहे.

देशभरातच ठणठणाट


पीव्हीसी लस महागडी आहे. वैद्यकीय उपसंचालक कार्यालयामार्फत लसींचा पुरवठा प्रथम महापालिकेच्या आरोग्य विभागाला केला जातो. तिथून गरजेनुसार शासकीय रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध करून दिली जाते. मनपातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तुटवड्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, नागपूर शहराची वार्षिक गरज 40 ते 45 हजार लसींची आहे. परंतु, आतापर्यंत प्रथम 7 हजार व नंतर 2 हजार अशा 9 हजार लसींचाच पुरवठा केला गेला. पुरेसा साठा मिळत नसल्याने मेडिकल, मेयो, डागा यासह शहरातील सर्वच दवाखान्यांमध्ये तुटवडा असल्याचे मान्य केले. नागपुरातच नाही तर राज्य आणि देशातच या लसीचा तुटवडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘ओळख’ असणाऱ्यांना तत्परतेने सेवा


दीड ते साडेतीन महिन्यांदरम्यान बाळांना ही लस दिली जाणे अपेक्षित आहे. 5 वर्षांच्या खालील मुलांना दिली जाऊ शकते. डॉक्टरांकडूनही लस देण्याचा आग्रह धरला जात आहे. यामुळे लहान बाळासह पालकही शहरातील दवाखान्यांमध्ये फिरत आहेत. पण, लस मात्र मिळत नाही. त्याचवेळी ‘ओळख’ असणाऱ्यांना मात्र तत्परतेने लसी दिली जाते. याप्रकाराने वैतागलेल्या पालकांचा लस देणाऱ्यांसोबत वादही होतो आहे. शुक्रवारी महापालिकेच्या बिनाकी महिला दवाखान्यात असाच प्रकार घडला. एक महिला बाळासह दवाखान्यात पोहोचली. तिच्या डोळ्यादेखत एका अन्य बाळाला लस दिली गेली. तिला मात्र लस उपलब्ध नसल्याने परतवून लागले गेले. या मातेने लस देणाऱ्या महिलेला या प्रकारासाठी जाब विचारत ‘स्टिंग ऑपरेशन’केले. त्यात दवाखान्यातील महिला कर्मचारी आमच्या नियमित पेशंटलाच लस देत असल्याचे सांगताना आणि तुम्हाल इथे लस मिळणार नसल्याचे स्पष्ट सांगताना दिसते.

एक वर्षापर्यंतच्या बालकांना सर्वाधिक धोका


न्युमोकोकल आजाराचा धोका 1 वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये सर्वाधिक जाणवतो. 2 वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये हा आजार गंभीर स्वरुपात आढळून येतो. या आजारामुळे लहान मुलांमध्ये होणारे धोके टाळण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात शासकीय आदेशानुसार न्युमोकोकल कन्ज्युगेट वॅक्सिनचा समावेश करण्यात आला आहे.

पीसीव्ही लसीचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. उपसंचालक कार्यालयाकडून साठा उपलब्ध होतो, त्याप्रमाणे पुढे पुरवठा केला जातो.


डॉ. नरेंद्र बहिरवार, मुख्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा