मुंबईः शिवसेनेतील शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये पक्षावरून सुरु असलेला वाद निवडणूक आयोगापुढे विचाराधीन आहे. बंडखोरीनंतर आम्ही खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला असून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरही शिंदे गटाने दावा केला आहे. आता या वादावर १२ डिसेंबर रोजी निवडणूक आयोगापुढे पहिली सुनावणी होणार (Hearing on Shiv Sena Party Symbol before EC) असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच महिन्यात या मुद्यावर निवाडा देताना चिन्हाबाबत निवडणूक आयोगानेच निर्णय घ्यावा, असे स्पष्ट निर्देश दिले होते. दरम्यान, आयोगाने दोन्ही गटांना पक्ष तसेच पक्षचिन्हावर दावा सांगण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे जमा करण्यास मुदतवाढ दिली आहे. दोनी गटांना येत्या ९ डिसेंबरपर्यंत आयोगाकडे ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत.
शिवसेनेत बंडखोरी झाल्यावर शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पत्र देऊन पक्ष व पक्षाच्या निवडणूक चिन्हावर दावा केला आहे. उद्धव ठाकरे गटाने त्यावर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाबाबत कोणताही निर्णय घेण्यापासून रोखण्यात यावे, अशी विनंती ठाकरे गटाच्याव तीने करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली व निवडणूक आयोगाला त्यावर निर्णय घेण्याची सूचना केली होती. आता निवडणूक आयोगापुढे त्यावर सुनावणी होणार असून पहिली सुनावणी १२ डिसेंबरला निश्चित झाली आहे. दरम्यान, दोन्ही गटांना आपापले दावे मांडण्यासाठी कागदपत्रे सादर करण्याची मुदतही निवडणूक आयोगाने वाढवून दिली आहे. आता ९ डिसेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करता येणार आहेत. दोन महिन्यापूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला होता.