शिवरायांचा अपमान भाजपला मान्य आहे का? ठाकरे गट आक्रमक राऊतांचा इशारा

0

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफिच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना दुसरीकडे भाजप प्रवक्त्यांनी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाच वेळेस माफी मागितली असल्याचे वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. औरंगजेबाची माफी शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) मागितली असं विधान भाजपच्या प्रवक्त्यांनी केलंय, हे भाजपला मान्य आहे का? असा सवाल करताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी राज्यपालांना पुन्हा माघारी पाठवण्याची मागणीदेखील राऊत यांनी केली आहे.

एका वृत्तवाहिनीवर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाकडे पाच वेळेस माफी मागितली असल्याचे म्हटले. तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना शिवाजी महाराज हे जुन्या लोकांचे नायक असल्याचे वक्तव्य केले होते. राज्यपालांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षांसह विविध संघटना, नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. त्यानंतर आता भाजप प्रवक्त्यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत.शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा दळभद्री वक्तव्य केलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला आहे. त्यातच भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी देखील वादग्रस्त विधान केले आहे. औरंगजेबाची माफी शिवाजी महाराजांनी मागितली असं विधान भाजपच्या प्रवकत्यांनी केलंय, हे भाजपला मान्य आहे का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी माफी मागितली? हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पाहिजे अशी मागणी राऊत यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपचे सहयोगी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. वीर सावरकरांच्या मुद्दावर रस्त्यावर उतरले, स्वागत आहे. जोडे मारत आंदोलन केले, त्याचेही स्वागत आहे. आता हे जोडे कोणाला मारणार आहात? भाजपच्या प्रवक्त्यांना की राज्यपालांना जोडे मारणार आहात, असा प्रश्न करत मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर दिले पाहिजे असेही संजय राऊत यांनी म्हटले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा