शिवसेनेच्या ठाकरे गटाशी युतीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून हिरवा कंदिल, शिवशक्ती-भीमशक्तीचा पुन्हा प्रयोग

0


मुंबई : शिवसेनेचा ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार असल्याची घोषणा (Shivsena-VBA Alliance) वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी मंगळवारी केली. यासंदर्भात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते व वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठका होऊन हा निर्णय झाला असल्याचे रेखा ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान, ही युती शिवसेनेच्या ठाकरे गटापर्यंतच मर्यादित राहणार की महाविकास आघाडीतील घटक पक्षही युतीत असणार, हे अद्याप निश्चित झालेले नसून त्याचा निर्णय शिवसेनेलाच घ्यायचा असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. या युतीमुळे आता राज्यातील राजकारणाची समीकरणे कशा पद्धतीने बदलतात, याकडे लक्ष लागलेले आहे.


युतीसंदर्भात माहिती देताना वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीचे राज्य कमिटीचे सदस्य महेंद रोकडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन आणि वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि अन्य नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठका सकारात्मक झाल्या होत्या. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाला युतीसाठी होकार कळवण्यात आला आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनीही प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली असून या नेत्यांमध्येही दोन बैठका झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून चार पक्षीय आघाडीतून निवडणूक लढवणार की शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच निवडणूक लढवणार, हे शिवसेनेलाच स्पष्ट करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भातील निर्णय त्यांच्याकडून आल्यास पुढच्या टप्प्याची चर्चा होऊ शकते, असा अंदाजही त्यांनी वर्तविला आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा