शेतकरी अन्नदातासोबतच ऊर्जादातही व्हावा : केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी

0

गडकरी, पवार यांना डी.लिट प्रदान, मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ


संभाजीनगर – ‘मराठवाडा ही संतांची भूमी आहे. या भूमीतून संतांनी समतेचा, माणुसकीचा संदेश दिला. या भागाला विकासाची तहान आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. मराठवाडा हा शेतीबहूल भाग असून इथल्या शेतीचे भविष्य कसे उज्ज्वल होईल, यासाठी आज प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. इथला शेतकरी अन्नदातासोबतच ऊर्जादातही झाला पाहिजे. त्यामुळे त्यांचे जीवन समृद्ध होण्यासह आत्महत्याही थांबवण्यास मदत होणार आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ दि. १९ नोव्हेंबर रोजी पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार श्री शरद पवार यांना डी. लिट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी बोलत होते. नालंदा विद्यापीठ, राजगीर (बिहार)चे कुलपती पद्मभूषण श्री डॉ. विजय भटकर दीक्षांत पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्यपाल तथा कुलपती श्री भगतसिंह कोश्यारी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. श्री प्रमोद येवले, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. श्री श्याम शिरसाठ, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्री गणेश मंझा, कुलसचिव प्रा. डॉ. श्री भगवान साखळे आदी मान्यवर उपस्थित होते.


केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी पुढे म्हणाले, “मराठवाड्यात मोठे औद्योगिक क्षेत्र आहे. तसेच जालना येथे होत असलेल्या ‘ड्रायपोर्ट’मुळे या भागाचा आणखी विकास होणार आहे. या ‘ड्रायपोर्ट’वरून येथील औद्योगिकसह कृषीमाल जगाच्या पाठीवर कुठेही पाठवणे शक्य होणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्याचे उत्पन्न वाढून आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार आहे. विद्यापीठानेही यादृष्टीने पाऊल उचलत ‘ड्रायपोर्ट’च्या अनुषंगाने काही अभ्यासक्रम सुरू केल्यास तरुणांनाही रोजगाराच्या दृष्टीने मोठा फायदा होणार आहे.”


“विद्यापीठ हे एक प्रकारचे नॉलेज पावर सेंटर आहे. त्यामुळे विद्यापीठाने प्रदेशानुसार संशोधन करण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. मराठवाडा सुखी, समृद्ध आणि संपन्न होण्यामध्ये तसेच सामाजिक, आर्थिक संपन्न होण्यामध्येही विद्यापीठ आणि महाविद्यालयांची मोठी भूमिका आहे. त्या भागातील सामाजिक, आर्थिक परिवर्तन करीत आणि शिक्षणात गुणात्मक परिवर्तन होण्याकरिता काय केले पाहिजे, याचाही विद्यापीठाकडून विचार होणे आवश्यक आहे,” असे मत यावेळी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
“डी. लिट ही टर्मिनल डिग्री असते. शैक्षणिक क्षेत्रातील ही सर्वोच्च पदवी आहे. त्यानंतर कोणतीही पदवी शिल्लक राहत नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठाकडून ही पदवी आज मला प्रदान करण्यात आली, हा मी माझा बहुमान समजतो. त्याबद्दल मी विद्यापीठाचे आभार मानतो,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी केले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा