श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताबला गुन्ह्याचा कुठलाही पश्चाताप नाही!

0

नवी दिल्ली : देशभर गाजलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात (Shraddha Walker Case) पोलिसांनी आरोपी आफताब पुनावाला याची पॉलिग्राफ चाचणी केली असून त्यात आफताबने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र, या चाचणी दरम्यान त्याच्या चेहऱ्यावर भय किंवा गुन्ह्याच्या पश्चातापाची कुठलीही चिन्हे दिसलेली नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. आफताबला श्रद्धाची हत्या अगोदरच करायची होती, असेही त्याने या चाचणीत सांगितले. श्रद्धाशिवाय इतर काही मुलींसोबत आपले संबंध होते, याची कबुलीदेखील आफताबने दिली या चाचणीतून दिली आहे. पॉलिग्राफ चाचणीनंतर आता आरोपी आफताबची गुरुवारी, एक डिसेंबर रोजी नार्को चाचणी होणार आहे. पॉलिग्राफ चाचणी आधी आफताबची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती.


पॉलिग्राफ चाचणीत आफताबने पोलिसांना हत्याकांडाशी निगडीत सगळ्या गोष्टींची माहिती खडानखडा सांगितली. हत्याकांडाशी निगडित अनेक गोष्टीचा उलगडा होण्यास या चाचणीची पोलिसांना मदत झाली आहे. श्रद्धाला ठार मारण्याच्या उद्देशाने दिल्लीत आणले होते, अशी कबुली त्याने दिली. श्रद्धाची हत्या केल्याची माहिती घरच्यांना नव्हती, असेही त्याने सांगितले. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या एका पथकाने वसईमध्ये येऊन आफताब आणि श्रद्धाचे नातेवाईक, परिचित, मित्र-मैत्रिणींची चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. पॉलिग्राफ चाचणीनंतर आता आरोपी आफताबची गुरुवारी एक डिसेंबर रोजी नार्को चाचणी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या हत्या प्रकरणाच्या तपासात दिल्ली पोलिसांनी बरीच मोठी प्रगती केली आहे. घटनेशी संबंधित अनेक तांत्रिक पुरावे पोलिसांना गवसले आहेत. त्याचा गुन्हा शाबीत करण्याच्या दृष्टीने फायदा होईल, असे सूत्रांनी सांगितले.