श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील हत्यार शोधण्यात दिल्ली पोलिसांना यश

0

​नवी दिल्ली : देशभर गाजत असलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाच्या तपासात दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. नराधम आरोपी अफताब पुनावाला याने ज्या हत्याराने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केले, ते हत्यार पोलिसांच्या हाती लागले आहे.(Shraddha Murder Case ) या प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा मानला जात आहे. दिल्ली पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करत असताना काही हत्यारे सापडली आहेत. याच हत्यारांनी आरोपी अफताब यांने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांना श्रद्धाची एक अंगठीही सापडली असून जी अफताबने नंतर दुसऱ्या मुलीला गिफ्ट केली होती. त्या मुलीला आफताबने आपल्या छतरपूर येथील फ्लॅटवर बोलावले होते, असे पोलिसांनी सांगितले.


दिल्ली पोलिसांच्या तपासात या प्रकरणातील आणखी बरीच महिती उघड झाली श्रद्धाची हत्या केल्यावर आफताबने इंटरनेटवर रक्ताचे डाग मिटविण्यासाठी उपयुक्त रसायनांची माहिती सर्च केली होती. त्यानुसार त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्यावर रक्ताचे सर्व डाग एका खास रसायनाने मिटवले होते.​ मात्र, हत्येच्या दिवशी आफताबने परिधान केलेल्या कपड्यांवर रक्ताचे डाग असावेत, असा अंदाज फॉरेन्सिक टीमने वर्तविला असून घटनेच्या दिवशी श्रद्धा आणि आफताबने घातलेले कपडे पोलिसांना अद्याप मिळू शकलेले नाहीत, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आफताब हा सातत्याने पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात पोलिसांनी न्यायालयातही ही माहिती दिली आहे.