नवी दिल्ली :श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी (Shraddha Murder Case) महाराष्ट्र पोलिसांची चौकशी केली जाणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. (Amit Shah on Shraddha Murder Case). २०२० मध्ये श्रद्धाने महाराष्ट्र पोलिसांकडे तक्रार देऊन तिच्या हत्येची भीती व्यक्त केली होती. त्यानंतर दोन वर्षानी ही भीती खरी ठरली असून तिची आफताब पुनावाला या तिच्या प्रियकराने हत्या केली. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या तत्कालीन भूमिकेवर संशय निर्माण झाला असल्याने आता त्याची चौकशी केली जाणार आहे.श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपींना कमीत कमी वेळेत कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. माझे संपूर्ण प्रकरणावर लक्ष आहे. मी देशातील जनतेला एवढेच सांगू इच्छितो की, ज्या कोणीही हे कृत्य केले असेल, त्याला कमीत कमी वेळेत कायदा आणि न्यायालयाद्वारे कठोरात कठोर शिक्षा सुनावली जाईल, असे शहा यांनी स्पष्ट केले.
श्रद्धाने दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र पोलिसांना चिठ्ठी लिहून आफताबची तक्रार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली होती. त्यानंतर पोलिसांनीही तपास केल्याचा दावा केला आहे.
मात्र, या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप नेत्यांकडून झाली आहे. आता त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाष्य केले असून चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र पोलिसांनी याप्रकरणाचा पाठपुरावा का केला नाही? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. याच संदर्भात महाराष्ट्र पोलिसांच्या चौकशीचे आदेश देण्यात येणार आहेत. तसेच, श्रद्धा प्रकरणात दोषींची गय केली जाणार नाही, असेही अमित शाह म्हणाले आहेत.