नागपूर : नागपूर विभागातील हजारो संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत मिळणार आहे. 61 कोटी रुपयांचा हा प्रस्ताव असून याविषयीची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्याशी झालेल्या चर्चेतून दिली आहे. अमरावती विभागातील नुकसानग्रस्त फलोत्पादकान राज्य शासनातर्फे मदत देण्यात आली. मात्र, नागपूर विभागातील शेतकरी या मदतीपासून वंचित होते. यासाठी खा कृपाल तुमाने यांनी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांचे याकडे पत्राद्वारे, वारंवार प्रत्यक्ष भेटीतून लक्ष वेधले. नागपूर विभागात अवेळी अतिवृष्टी, गारपिटीमुळे यावर्षी मोठे नुकसान झाले. दरवर्षी साधारणता जुलै व ऑगस्टमध्ये होणारा पाऊस अलीकडे ऑक्टोंबरमध्ये होत आहे. यावर्षी ऑगस्ट अखेर व ऑक्टोबर महिन्यात भरपूर पाऊस झाला. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देखील मिळालेली नाही. नागपूर जिल्ह्यात सरासरी 1064.1 मिलिमीटर इतका सरासरी पाऊस पडतो.
मात्र, बेभरवशाचा पाऊस व अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. काटोल कळमेश्वर नरखेड तालुक्यात संत्रा व मोसंबी पिकाचे अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले. इतर पिकांची देखील परिस्थिती चांगली नाही. एकंदरीत सततच्या पावसामुळे संत्रा व मोसंबीचे उत्पादन कमी झाले. गुणवत्तेअभावी योग्य भाव फलोत्पादकांना मिळू शकला नाही. हवालदिल शेतकऱ्यांना संत्र्याला प्रति किलो 15 ते 20 रुपये इतकाच भाव मिळाला. गतवर्षी हाच भाव दुप्पट होता. अतिवृष्टी बाबतच्या नोंदी कृषी विभागाने स्थानिक पातळीवर घेतल्या तरी कुठलीच मदत नसल्याने नागपूर जिल्ह्यातील हवालदिल अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारच्या मदतीची तातडीने गरज आहे याकडे खासदार कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 61 कोटी रुपयांचा प्रस्ताव तातडीने मंजूर केला जाईल. फलोत्पादकांना ठोस अशी मदत दिली जाईल असे स्पष्ट आश्वासन खासदार कृपाल तुमाने यांना दिले.