सत्तासंघर्ष सुनावणी टळली, नागपुरातील शिवसेना पक्ष कार्यालय कुणाचे?

0

नागपूर :नागपुरात येत्या १९ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे़. यापूर्वी २०१९ मध्ये नागपुरात अधिवेशन झाले. दोन वर्षे कोरोना संक्रमणामुळे अधिवेशन होऊ शकले नाही़. दोन वर्षानंतर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची नेत्यांसोबतच जनतेला प्रतीक्षा आहे. यंदा अर्थातच जोरात तयारी सुरू आहे़. नवे सरकार आल्याने विधानभवन परिसरात कामे जोरात आहेत. विधानसभा सभागृहातील खुर्च्या, माईक सारेकाही चकाचक झाले आहे. एकंदरीत नवे सरकार नव्या आव्हानांसाठी तयार होत असतानाच विधानभवन परिसर, आमदार निवास सगळीकडे नवा लूक देण्याचा प्रयत्न चालला आहे . खर्चासाठी पैशाची चिंता करू नका असेही सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील सत्तासंघर्षाबाबत महत्वपूर्ण असलेली सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली गेली असताना नागपुरातील विधानभवन परिसरातील शिवसेना कार्यालय कुणाचे याचाही निर्णय टांगणीला आहे. परिसरात भाजप कार्यालयाला लागूनच शिवसेना पक्ष कार्यालय देखील आहे़. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्यात आले असून शिंदे गट व उद्धव ठाकरे गटात शिवसेना विभागली गेली आहे़. दोन्ही बाजूने खरी शिवसेना आमचीच असा दावा केला जात आहे. उगीच गोंधळ नको या न्यायाने तूर्तास प्रशासनाने या कार्यालयाच्या नाम फलकावर पडदा टाकलेला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी ४० आमदारांना सोबत घेत भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले. साहजिकच या बंडानंतर ‘शिवसेना’ कुणाची हा वाद सुरू आहे़. सर्वोच्च न्यायालयात यावर आज सुनावणी होणार होती. पण ती पुढे ढकलण्यात आली आहे. धनुष्यबाण हे चिन्ह सध्या कुणाकडेच नाही़. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाला सध्या ढाल तलवार हे चिन्ह मिळाले असून ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे़. दोन्ही गट आपलीच शिवसेना खरी असल्याचे सांगत संघटन वाढीवर भर देत आहे.