सरपंचाकडून वनसंपदेची तस्करी

0

चंद्रपुरात कारवाई ; तीन बोलोरो वाहन जप्त


चंद्रपूर. चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील बफर झोनमधील (buffer zone of Chandrapur forest area) बांबूच्या ताटव्यांची तस्करी (Bamboo smuggling) करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात वन विभागाला (Forest Department) यश आले आहे. निंबाळा येथील सरपंचाचाच या प्रकारात समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे. तो बोलोरो पिकअप वाहनाच्या साह्याने बफर झोनमधील बोर्डा परिसरातून बांबू ताटव्यांची अवैध वाहतूक करीत होता. त्याला वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. या कारवाईत तीन बोलोरो वाहनसुद्धा जप्त करण्यात आले आहेत. गावाच्या विकासाची धुरा सांभाळणारे सरपंच असा प्रकार करत असतील, तर विकास कसा होणार, असा प्रश्न या कारवाईतून उपस्थित झाला आहे. यापूर्वीही त्याच्यावर दोनदा कारवाई करण्यात आली होती हे विशेष. सौरभ दुपारे असे त्या सरपंचाचे नाव आहे.


चंद्रपूर वनविभागातील बफर झोन क्षेत्रातून बांबू व ताटव्यांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी एस. व्ही. महेशकर यांना मिळाली. त्यांनी भल्या पहाटे कुडकुडत्या थंडीत आपल्या पथकासह बोर्डा जंगल परिसर गाठले. यावेळी तीन वाहन जाताना दिसून आले. त्यांनी एम एच ३४, एव्ही १५८१ व एमएच ३४ बीझेड ०२५५ हे बोलेरो व टाटा इन्ट्रा एमएच ३४ बीझेड ०३३१ हे तीनही वाहन थांबवले. यावेळी वाहनात बांबूचे ताटवे आढळून आले. स्वत: सरपंच सौरभ दुपारेही तेथे उपस्थित होते. आरएफओ महेशकर यांनी तीनही वाहने जप्त केले.


ही कारवाई चंद्रपूर बफरच्या वनपरीक्षेत्र अधिकारी एस. व्ही. महेशकर यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहायक आर. यु. बेग, वनरक्षक पर्वतकर, वनरक्षक प्रीती मडावी, महेश दाते यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले. आरएफओ महेशकर यांनी सरपंचावर केलेल्या या कारवाईने अवैध बांबूकटाई करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


वन विभागाकडून वनसंपदा तसेच वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. सर्व प्रयत्नांनंतरही तस्कारी आणि शिकारीचे प्रकार सुरूच आहेत. त्यातूनच मानल वन्यप्रणी संघर्षही वाढत आहे. 80 टक्के घटना मानसाच्या जंगलातील घुसखोरीमुळे झाल्याचे आजवरच्या घटनांमध्ये दिसून आले आहे. या प्रकाराला पायबंद घालण्यासाठी वारेमाप प्रयत्नही केले जात आहेत. पण, सारेच प्रयत्न अपयशी सिद्ध होत आहेत.